श्रीहरिकोटा – या वर्षीच्या आपल्या पहिल्या उपग्रहाचे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून आज दि. 7 नोव्हेंबर रोजी प्रक्षेपण करण्यात येणार आहे. शत्रू राष्ट्रावर नजर ठेवण्यासाठी इस्रो “एओएस-01′ अर्थात अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइटचे प्रक्षेपण करणार आहे. या उपग्रहाचे पीएसएलव्ही-सी 49 रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे प्रक्षेपण 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी होणार आहे. यासाठीचा काउंटडाऊन शुक्रवारी सुरू झाला आहे.
एओएस-01 उपग्रह हा शत्रू राष्ट्रावर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल. याच्या सिंथेटिक ऍपर्चर रडारच्या माध्यमातून दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येणार आहे तसेच हा उपग्रह ढगांच्या अडथळ्यांना भेदून हाय रिझोल्युशनचे फोटो घ्यायला सक्षम आहे. त्यामुळे लष्कराच्या क्षमतेत वाढ होणार आहे. चीनसोबत लडाखच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तसेच पाकिस्तानी घुसखोरीचा मुद्दा लक्षात घेता हा उपग्रह लष्कराला मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरणार आहे.त्याचबरोबर कृषी, वने, भूविज्ञान या क्षेत्रात तसेच किनारी भागातील सुरक्षा मजबूत करण्यासाठीही होणार आहे.
या उपग्रहासोबत इतर व्यापारी उपग्रहांचे इस्त्रोच्या न्यूस्पेस इंडिया लिमिटेड सोबतच्या व्यापारी करारांतर्गत प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या उपग्रहांच्या प्रक्षेपणाचे लाईव्ह टेलिकास्ट (थेट प्रक्षेपण) इस्त्रोच्या वेबसाईट, युट्यूब, फेसबुक आणि ट्विटर चॅनेलवरून करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे या वर्षी इस्त्रोच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. त्या पार्श्वभूमीवर या वर्षातील इस्त्रोचे हे पहिले प्रक्षेपण आहे.
पीएसएलव्ही सीपीएसएलव्ही-सी 49 च्या प्रक्षेपणानंतर इस्त्रो लगेचच पीएसएलव्ही-सी 50 या रॉकेटच्या माध्यमातून जी सॅट-12 टी उपग्रह प्रक्षेपण करणार आहे. त्यानंतर जीआय सॅट-1 उपग्रहाला जीएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.