बंगलुरू – इस्त्रोने पृथ्वीच्या निरीक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या ईओएस – 01 या उपग्रहासह एकूण नऊ उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण केंद्रातून दुपारी 3 वाजून 12 मिनीटांनी या उपग्रहांना घेऊन जाणाऱ्या पीएसएलव्ही सी 49 या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले.
आजचे हे प्रक्षेपण खराब हवामानामुळे नियोजित वेळेपेक्षा दहा मिनीटे उशिरा झाले. पण त्यात अन्य कोणतेही अडथळे आले नाहीत. उड्डाणानंतर सुमारे अर्ध्या तासाने हे सर्व उपग्रह त्यांच्या नियोजित कक्षेत सोडण्यात आले असे इस्त्रोने जाहीर केले.
या मोहीमेत आठ उपग्रह अन्य देशांचे आहेत. त्यात अमेरिका आणि लक्झेंमबर्गचे प्रत्येकी चार उप्रगह आहेत. कोविडच्या काळानंतर झालेले हे इस्त्रोचे पहिले प्रक्षेपण आहे. कोविड मुळे मधला काहीं काळ इस्त्रोचेही कामकाज थंडावले होते.
पीएसएलव्ही हे यान इस्त्रोसाठी अत्यंत यशस्वी ठरलेले यान असून या यानाची ही 51 वी अंतरीक्ष फेरी होती. श्रीहरीकोटाच्या प्रक्षेपण स्थळाहून अंतरिक्षात सोडण्यात आलेले हे 77 वे उड्डाण होते. याद्वारे इस्त्रोने 33 देशांचे एकूण 328 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले आहेत.