इस्रोचे प्रयत्न सुरूच राहणार… (अग्रलेख)

भारताची बहुचर्चित अवकाश मोहीम असलेल्या “चांद्रयान 2′ मोहिमेला शेवटच्या काही क्षणांमध्ये थोडा अपयशाचा सामना करावा लागला असला तरी जे यश मिळवले आहे ते प्रचंड असल्याने निराश किंवा नाउमेद होण्याची अजिबातच गरज नाही. शेवटच्या काही क्षणांमध्ये यशाने हुलकावणी दिल्याने इस्रोचे प्रमुख के. सीवन यांना अश्रू अनावर झाले कारण ही मोहीम 100 टक्‍के यशस्वी होणार याची खात्री होती. क्रिकेटच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकण्याची आशा असतानाच सीमेवर झेलबाद झाल्यावर जसे होते तसेच यावेळी झाले.

आणखी काही सेकंद मिळाले असते तर इस्रोने आणखी एक इतिहास रचला असता; पण जे यश मिळाले तेही काही कमी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अवकाश संस्थेचे शास्त्रज्ञ आणि इतरांचे अभिनंदन करताना जे शब्द वापरले आहेत ते म्हणूनच महत्त्वाचे आहेत. विज्ञानात प्रयोग महत्त्वाचे असतात कारण विज्ञानात अपयश नसतेच हे मोदी यांचे शब्द सर्व संबंधितांना निश्‍चितच धीर देतील. या मोहिमेचे आजपर्यंतचे सर्व कार्य व्यवस्थित आणि नियोजनाप्रमाणे पार पडले असल्यानेच ऐनवेळी मिळालेले हे अपयश धक्‍कादायक आहे. चंद्राच्या भूमिपासून फक्‍त 2 किलोमीटर दूर असताना “विक्रम’ लॅंडरचा संपर्क तुटला. यामुळे निराश होण्याची गरज नाही. कारण इस्रो पुढील प्रयत्न सुरूच ठेवणार आहे.

अगदी काव्यात्मक भाषेत बोलायचे झाले तर अवकाशात जे काही झाले त्याला “चंद्र आहे साक्षीला’. मुख्य म्हणजे भारताची ही मोहीम 95 टक्‍के यशस्वी झाल्याची माहिती इस्रोने दिली आहेच. त्यामुळे कोणत्याही परीक्षेत मिळालेले 95 टक्‍के गुण जेवढे महत्त्वाचे तेव्हढेच इस्रोचे हे यश महत्त्वाचे आहे. चंद्रावर स्वारी करणाऱ्या जगातील इतर बड्या देशांच्या यादीत भारताचे नाव आता सन्मानाने घेतले जात आहे हीच मोठी गोष्ट आहे. जगातील अवकाश संशोधन विभागात इस्रोला मानाचे स्थान आहे. त्यामुळे एखाद्या मोहिमेत मिळालेल्या किंचित अपयशापेक्षा आजपर्यंत मिळालेल्या मोठ्या यशाचाच विचार करायला हवा. गेल्या काही काळात इस्रोने अनेक मोठ्या मोहिमा यशस्वी करून दाखवल्या आहेत.

इस्रोची महत्त्वाकांक्षी अशी मंगळयान मोहीम यशस्वी झाली आहे. त्यापूर्वीच्या “चांद्रयान 1′ मोहीमही संपूर्ण यशस्वी झाली आहे. तसेच गेल्या वर्षी देशातील सर्वांत अवजड उपग्रह म्हणजेज “जीसॅट 11’चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आल्याने इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला होता. एकाचवेळी इतर अनेक देशांचे 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रमही इस्रोच्या नावावर आहे. अगदी थोड्या कालावधीत इस्रोने केलेली ही आजपर्यंतची कामगिरी अचंबित करणारी आहे. सुमारे 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेकडे तेव्हा साधनांचा तुटवडा होता.

आधुनिक तंत्रज्ञानही नव्हते. पण कमालीची जिद्द होती आणि आशावाद होता. अवकाश मोहिमेत प्रक्षेपणासाठी लागणारे अग्निबाणाचे सुटे भाग सायकलवरून नेणे आणि “आर्यभट्ट’ या भारताच्या पहिल्या उपग्रहास बैलगाडीतून प्रक्षेपण स्थळावर नेण्याचे काम फक्‍त भारतासारख्या देशातच इस्रोसारख्या संस्थेकडूनच होऊ शकते. जेव्हा साधनांचा अभाव होता तेव्हाही शास्त्रज्ञांची उमेद प्रचंड होती. आतातर सर्व काही उपलब्ध आहे म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत इस्रोने केलेली वाटचाल केवळ अभिमानास्पद आहे. आज अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी जगातील अनेक देश भारताची मदत घेतात.

भारताचा उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याने जगातील अनेक देश आपले उपग्रह भारताकडून प्रक्षेपित करण्यास इच्छुक आहेत. इस्रोने आतापर्यंत 28 हून जास्त देशांचे 239 उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करून भारतीय अर्थव्यवस्थेला उत्पन्नाचा नवीन मार्ग उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या संस्थेच्या क्षमतेबाबत आणि कामगिरीबाबत कोणालाच शंका नाही. जगातील बहुतेक प्रमुख देशांना महत्त्वाच्या अवकाश मोहिमेत प्रथम अपयशच आले होते. अनेक देशांना चांद्रमोहिमेत 100 टक्‍के अपयश आले होते. त्यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न करून चंद्राला गवसणी घातली होती. भारतालाही “चांद्रयान 2′ प्रक्षेपित करण्याची मोहीम तांत्रिक कारणाने एकदा पुढे ढकलावी लागली होती. दुसऱ्या प्रयत्नात प्रक्षेपणाची ही मोहीम यशस्वी झाली आणि भारताची ही एकूण “चांद्रयान 2′ मोहीम तर 95 टक्‍के यशस्वी झाली आहे. त्यामुळे या मोहिमेची बहुतेक उद्दिष्टे पूर्ण झाली, असे म्हणायला हरकत नाही.

विक्रम लॅंडरच्या माध्यमातून प्रज्ञान रोव्हरला चांद्रभूमीवर उतरवणे हे या मोहिमेचे अंतिम उद्दिष्ट असले तरी ते साध्य न झाल्याने एकूण मोहिमेच्या यशावर फारसा काही फरक पडत नाही. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी नव्या उमेदीने आणि उत्साहाने आगामी मोहिमांकडे वळायला हवे. गेल्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना 2022 पर्यंत अंतराळामध्ये भारतीयाला पाठविण्याची घोषणा केली होती. त्याशिवाय इस्रोने सौरमोहीमही नियोजित केली आहे. आतापर्यंत सूर्याच्या जास्तीतजास्त जवळ यान पाठवण्याचा विचारही इतर कोणत्या देशाने केलेला नाही.

भविष्यात हे शक्‍य झाल्यास भारताच्या शिरपेचात सतत मानाचे तुरे खोवणाऱ्या इस्रोसाठी हे एक मोठे यश असणार आहे. म्हणूनच एखाद दुसऱ्या अपयशी मोहिमेनंतर नाउमेद न होता उलट अधिक आत्मविश्‍वासाने पुढील मोहिमांना सामोरे जावे लागेल. शेवटच्या क्षणी संपर्क तुटला असला तरी विक्रम चांद्रभूमीवर उतरले असल्याची आशा कोट्यवधी भारतीयांनाही आहे. अर्थात काहीही झाले तरी तमाम भारतीयांना या चांद्रयान मोहिमेचा आणि ही मोहीम यशस्वीपणे राबवणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचा अभिमान आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×