पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या चांद्रयान 2 मोहिमेचे कौतुक केले आहे. चांद्रयान 2 झेपावताच दोन्ही हातांनी टाळ्या वाजवून आनंद साजरा करण्याचा मोह पंतप्रधान नरेंद्र मोदीही आवरू शकले नाहीत. तसेच इस्रोतील सर्वच शास्त्रज्ञांचे अभिनंदनही केले आहे. तर, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही ट्विट करुन इस्रोच्या वैज्ञानिकांना सॅल्यूट केला आहे. तसेच, चांद्रयान 2 च्या मोहिमेच्या पुढील यशस्वीतेसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत.
या संदर्भात मोदींनी ट्विट केले असून त्यात त्यांनी “चांद्रयान 2 मोहीम देशातील कोट्यवधी तरुणांना प्रेरणा देणारी आहे. तरुणांचा विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारी आणि उत्कृष्ट दर्जाच्या संशोधनाची आवड निर्माण करणारी ही प्रयत्नशील मोहीम आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रवावरील विवरांमध्ये अभ्यास आणि संशोधनाचे काम चांद्रयान 2 द्वारे होत आहे. त्यामुळे ही मोहीम युनिक असल्याचेही पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या मोहिमेतून चंद्राबद्दलची नवीन माहिती जगासमोर येईल. यापूर्वी अशी मोहीम कधीही झाली नसल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. चांद्रयान 2 ही मोहीम देशातील प्रत्येकाला अत्यानंद देणार आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.