Israeli Airstrike On Gaza School – इस्रायलने गाझामधील एका शाळेवर केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये किमान ८० जण ठार झाले. हमास आणि इस्रायलमध्ये गेल्या १० महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यानचा हा भीषण हवाई हल्ला होता, असे पॅलेस्टनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
इस्रायली अधिकाऱ्यांनी या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शाळेमध्ये असलेल्या हमासच्या कमांड सेंटरला लक्ष्यकरण्यात आल्याचे इस्रायलने म्हटले आहे. मात्र हमासने हा दावा फेटाळला आहे.
मध्य गाझा शहरातल्या ताबीन शाळेवर झालेल्या या हवाई हल्ल्यामध्ये ४७ जण जखमी देखील झाले आहेत. या शाळेच्या हल्ल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओमध्ये मोठ्या इमारतीच्या भिंती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसते आहे.
या हल्ल्यानंतर गाझातील अल-आहली रुग्णालयात ७० मृतदेह आणले गेल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. पहाटेच्या सुमारास झालेल्या या हल्ल्याची कोणतीही पूर्वसूचना दिली गेलेली नव्हती.
शाळेतील सर्व लोक शाळेतल्या मशिदीमध्ये सकाळच्या प्रार्थनेसाठी जमले होते. त महिला आणि मुले झोपेतच होते. एकापाठोपाठ एक तीन क्षेपणास्त्रे शाळेवर आणि मशिदीवर पडल्याने संपूर्ण इमारत जमिनदोस्त झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या शाळेमध्ये ६ हजार पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला होता. मृतांपैकी अनेकांना ओळखणेही शक्य नाही. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांची संख्या जास्त आहे.
हमास आणि इस्लामिक जिहादचे सुमारे २० अतिरेकी आणि वरिष्ठ कमांडर इस्रायली सैन्यावर हल्ल्याची योजना आखण्यासाठी ताबीन शाळेच्या परिसराचा वापर करत होते, असे इस्रायली गुप्तचरांनी म्हटले आहे.
गाझातील शाळांचे मोठे नुकसान…
गाझातील बहुतेक शाळांमध्ये सध्या विस्थापित पॅलेस्टिनींसाठी आश्रय छावण्या सुरू आहेत. गाझातील ५६४ शाळांपैकी ४७७ शाळांचे युद्धात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नुकसान झाले आहे, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.
मध्य गाझामधील विस्थापित पॅलेस्टिनींना आश्रय देणाऱ्या शाळेवर जून महिन्यात झालेल्या इस्रायली हल्ल्यात किमान ३३ लोक ठार झाले होते. गुरुवारी पूर्व गाझातील दोन शाळांवर इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यात १५ जण ठार झाले होते.