जेरूसलेम – करोनावर इस्रायलनेही एक लस विकसित केली असून त्याच्या मानवी चाचण्या याच महिन्याच्या अखेरीपासून सुरू होणार आहेत. त्या देशाच्या सरकारने अधिकृतपणे आज ही माहिती दिली.
इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायलॉजिकल रिसर्च या संस्थेने ही लस विकसित केली आहे. ब्रिलाईफ असे या लसीचे नाव असणार आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यातच त्यांनी ही लस विकसित केली होती. पण वैद्यकीय प्रचलित पद्धतीनुसार त्यांच्या रितसर चाचण्यांची प्रक्रिया झाल्याशिवाय आम्ही ती बाजारात आणणार नाही, असे त्यांनी त्याचवेळी स्पष्ट केले होते. आता या लसीच्या प्रत्यक्ष मानवी चाचण्या सुरू होत आहेत.
इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी सोमवारी प्रयोगशाळेला भेट देऊन तेथील एकूण स्थितीची माहिती घेतली. या लसीच्या मानवी चाचण्या सुरू होत आहेत ही आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे असे त्यांनी म्हटले आहे.
या प्रयोगशाळेतील वैज्ञानिकांनी सांगितले की, अशी लस विकसित करण्यासाठी आम्ही फेब्रुवारी महिन्यात कामाला सुरुवात केली आणि नऊ महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर आम्हाला त्यात यश आले आहे.
आता आमचे हे संशोधन अंतिम टप्प्यात आले आहे, ही लस करोनावर अत्यंत परिणामकारक शाबित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.