आभार मानताना नेतन्याहूंकडून भारताचा उल्लेख नाही

जेरुसलेम : इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधील तणाव वाढत चालला आहे. एकीकडे हमास कट्टरवादी संघटना गाझातून इस्राईलवर रॉकेट हल्ले करत आहे, तर दुसरीकडे इस्राईल गाझातील नागरी परिसरांनाच लक्ष्य केल्याचा आरोप होतोय. त्यात इस्राईलने माध्यम संस्थेच्या इमारतीलाच लक्ष्य केल्यानंतर जगभरातून टीकाही झाली. या मुद्द्यावर जगही विभागलंय. या पार्श्वभूमीवर इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी (16 मे) ट्वीट करत इस्राईलला पाठिंबा देणाऱ्या 25 देशांचे आभार मानले. मात्र, त्यात भारताचा उल्लेखही नाही

नेतन्याहू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, ‘इस्राईलच्या झेंड्यासोबत मजबूतपणे उभे राहिल्याबद्दल आणि दहशतवादी हल्ल्यांविरोधात स्वसंरक्षणाच्या इस्राईलच्या अधिकाराला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.’ आपल्या ट्विटमध्ये नेतन्याहू यांनी 25 देशांच्या राष्ट्रीय ध्वजाचा उपयोग केला आहे. यात अमेरिकेसह अलबेनिया, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, ब्राझिल, कॅनडा, कोलंबिया, सायप्रस, जॉर्जिया, जर्मनी, हंगरी, इटली, स्लोवेनिया आणि यूक्रेनचा समावेश आहे.

विशेष म्हणजे भारतातील सत्ताधारी पक्ष भाजपच्या अनेक नेत्यांनी इस्राईलला पाठिंबा दिलाय. भारतात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात #IStandWithIsrael हॅशटॅग वापरत ट्विट्स करण्यात आलेत. यात भाजपचे नेते आघाडीवर आहेत. असं असूनही इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पाठिंबा देणाऱ्या देशांचे आभार मानताना भारताचा उल्लेखही केलेला नाही.

दुसरीकडे भारतातून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ देखील मोठ्या प्रमाणात ट्विट्स झालेत. सत्ताधारी पक्षांच्या अनेक मोठ्या नेत्यांनी इस्राईलला पाठिंबा दिलेला असला तरी मोदी सरकारने देश म्हणून कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून या प्रकरणात इस्राईलला पाठिंब्याची जाहीर भूमिका घेतलेली नाही. मात्र, संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी इस्राईल-हमास युद्धजन्य परिस्थितीवर भूमिका जाहीर केलेली आहे.

तिरुमूर्ती यांनी 11 मे रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत म्हटलं होतं, ‘दोन्ही बाजूंनी जमिनीवरील सीमा स्थिती बदलण्याचा प्रयत्न करणं टाळलं पाहिजे. भारत या हिंसेचा आणि गाझाकडून होणाऱ्या रॉकेट हल्ल्याचा निषेध करतो. यावेळी त्यांनी लवकरात लवकर ही हिंसा बंद करण्यावरही भर दिला.

दुसरीकडे नेतन्याहू यांनी एका ट्विटमध्ये म्हटलंय, इस्राईलचे हल्ले तोपर्यंत सुरुच राहतील जोपर्यंत इस्राईलच्या नागरिकांची सुरक्षा निश्चित होत नाही. कट्टरवादी संघटना हमास दुहेरी युद्ध करत आहे. ते एकिकडे इस्राईलच्या नागरिकांना लक्ष्य करत आहे, तर दुसरीकडे स्वतः पॅलेस्टाईनच्या नागरिकांच्या आड लपत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.