गाझा सिटी – इस्राएल इथल्या गाझा भागात आज सकाळी इस्राएली हवाई दलाने हल्ला केला. दक्षिण भागात पॅलेस्टाईनच्या समर्थकांनी काल केलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हमास सैन्य दलाच्या दोन केंद्रावर हा हल्ला करण्यात आला. गाझा शहराच्या पश्चिमेला असलेल्या कसमम साइटसह हमास सैन्याच्या अल-कसम ब्रिगेडस या हमास सैन्य शाखेच्या दोन ठिकाणांवर हल्ला करण्यात आले, असे हमासच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
शनिवारी रात्री उशिरा, गाझामधील पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी दक्षिण इस्त्राईलमध्ये येथे तीन रॉकेट सोडली होती. ही तिन्ही रॉकेट “आयर्न डोम’ संरक्षण यंत्रणेने हवेतच रोखली होती, असे सैन्याने म्हटले आहे. या रॉकेटमुळे काही जण किरकोळ जखमी झाले आहेत, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 29 नोव्हेंबरला इस्रयली लढाऊ विमानांनी हमासच्या ठिकाणांवर हल्लेही केले होते. त्यापूर्वी हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्याला हे प्रत्युत्तर होते.