पूर्व सीरियामध्ये इस्रायलचे हवाई हल्ले latest-newsआंतरराष्ट्रीय By प्रभात वृत्तसेवा On January 13, 2021 10:26 pm Share बैरुत, (सीरिया), दि. 13- इस्रायलच्या लढाऊ विमानांनी आज पूर्व सीरियातील इराण समर्थक गटांचे शस्त्रसाठे आणि मोक्याच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये डझनभर दहशतवादी मारले गेले आणि जखमी झाले, असे युद्धविषयक निरीक्षक गटांनी म्हटले आहे. हे हल्ले इराकच्या सीमेजवळच्या देर अल झौर, मयादीन अणि बौकामाल आदी ठिकाणांवर केले गेले, असे सीरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. देर-अल-झौरमध्ये आणि इराकच्या सीमेजवळ किमान 18 ठिकाणी हवाई हल्ले केले गेले. या हल्ल्यात काही शस्त्रसाठे उद्ध्वस्त केले गेले, असे युद्धविषयी निरीक्षक गटाने म्हटले आहे. तर या हल्ल्यांमध्ये 23 जण मारले गेले. त्यामध्ये सीरियाचे 7 आणि उर्वरित इराण समर्थक दहशतवादी होते. तर 28 जण जखमी झाले असे ब्रिटनस्थित मानवी हक्क विषयक सिरीयाच्या निरीक्षकांनी म्हटले आहे. अमेरिकेने उपलब्ध करून दिलेल्या गोपनीय वृत्ताच्या आधारे हे हवाई हल्ले केले गेले, असे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्ला झालेल्या गोदामांचा वापर शस्त्र साठवणूकीसाठीची पाईपलाईन आणि इराणी शस्त्रांच्या देखभालीसाठी केला जात होता. इराणच्या आण्विक कार्यक्रमासाठी सहाय्य करणाऱ्या घटकांसाठी पाइपलाइन म्हणूनही ही गोदामे वापरली जात होती, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. इस्रायलने इराणच्या लष्करी केंद्रांवर यापूर्वी अशाप्रकारे शेकडो वेळा हवाई हल्ले केले आहेत. मात्र कधीही त्याची जबाबदारी स्वीकारली नाही आणि त्याबाबत वाच्यताही केलेली नाही. डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा #airstrikesyria