जेरुसलेम – इस्रायलच्या लढाऊ विमानांनी आज उत्तर सीमेवर सिरीयाच्या सीमा प्रदेशात घिरट्या घातल्या. हा लढाऊ विमानांचा युद्धसराव असून बुधवारपर्यंत हा चालणार असल्याचे इस्रायलच्या संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
या युद्धसरावादरम्यान उत्तर सीमा भागात स्फोटांचे आवाजही ऐकू येतील. तसेच या भागातील विमानांची वर्दळही वाढलेली असणार आहे. हवाई संरक्षण सज्जतेची तयारी तपासण्यासाठी हा युद्धसराव केला जात आहे, असेही इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र या लढाऊ विमानांच्या घिरट्यांमुळे सिरीयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इस्रायलने यापूर्वी सिरीयामधील इराणी बंडखोरांच्या अड्ड्यांवर अनेकदा हल्ले केले आहेत. इराणचा पाठिंबा असलेल्या लेबेनानच्या हिज्बुल्ला संघटनेच्या तळांवरही इस्रायलने हल्ले केले आहेत. त्यामुळे ही इस्रायलची हवाई हल्ल्याची तयारी असल्याची शक्यता सिरीयाने व्यक्त केली आहे.
इस्रायल हवाई हल्ल्याची तयारी करत असल्याचे संदेश आपण पकडले असल्याचेही सिरीयाने म्हटले आहे. गेल्या दोन महिन्यात इस्रायलने इराणी तळांवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यांच्या पार्श्वभुमीवर सिरीयाकडून ही भीती व्यक्त करण्यात येत आहे.