करोना किटसाठी इस्त्राइलच्या मोसादचं मिशन

दोन दिवसांत मिळवले एक लाख टेस्ट किट

इस्त्राइल – इस्त्राइलमध्ये करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी गुप्तचर संघटना मोसाद देखील सहभागी झाली आहे. मोसादने करोना व्हायरसशी सामना करण्यासाठी एक लाख टेस्ट किट मिळवले आहे. या मोहिमेअंतर्गत हे सर्व किट देशातील वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले आहेत. हे सर्व किट परदेशातून मिळवले असून येत्या काही दिवसांत अजून लाखो किट मिळवण्याचा मोसादचा प्रयत्न आहे. पण हे किट किती उपयोगाचे आहेत यासंबंधी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मोसाद शक्‍यतो कोणत्याही खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सहभागी होत नाही. पण देशात किटचा तुटवडा झाला असल्याने मोसादची मदत घेतली जात आहे. ज्या देशांशी आपले राजनैतिक संबंध नाहीत अशा देशांमधून हे किट मिळवण्यात आले आहेत, अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये 40 लाख किट मिळवण्याचा मोसादचा प्रयत्न असणार आहे. या सर्व मोहिमेवर मोसादचे संचालक स्वत: लक्ष ठेवून आहेत.

इस्त्राइलमध्येही करोनाने थैमान घातले असून पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी देशातील प्रयोगशाळांनी दिवसाला किमान पाच हजार चाचण्या कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. करोनाचा खात्मा करण्यासाठी इस्त्राइलमध्ये गुप्तचर यंत्रणा आणि तपास यंत्रणा एकत्र काम करत असून आरोग्य विभागाला मदत करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.