Israel-Lebanon War । इस्रायल आणि लेबनॉनमध्ये मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. हेझबोलाचा प्रमुख हसन नसरल्लाहला ठार केल्यानंतरही इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरू ठेवलेत. हसन नसरल्लाहलाच्या मृत्यूनंतर त्याचा उत्तराधिकारी हाशेम सफीद्दीनलाही ठार करण्यात आले आहे. यानंतर आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनॉनची परिस्थिती गाझासारखी करण्याची धमकी दिली.
“लेबनॉनची परिस्थिती गाझासारखी करू ” Israel-Lebanon War ।
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनॉनला कडक इशारा दिला आहे. बेंजामिन नेतन्याहू यांनी एक व्हिडीओ संदेश दिला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी, ‘लेबनॉनने हेझबोलाला तुमच्या सीमेत काम करण्यास परवानगी दिली तर देशाची स्थिती गाझासारखी होऊ शकते. हेझबोलापासून तुमचा देश मुक्त करा. जेणेकरून हे युद्ध संपू शकेल आणि पुढील विध्वंस टाळता येईल’, असे बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनॉनच्या लोकांना उद्देशून म्हटलं आहे. एवढंच नाही तर बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनॉनच्या लोकांना हेझबोलाला बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भातील वृत्त एका इंग्रजी वर्तमापत्राने दिली आहे.
इस्रायली सैन्याचे हेझबोलाच्या विरोधात आक्रमण तीव्र Israel-Lebanon War ।
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हा इशारा दिला तेव्हा इस्रायली सैन्याने लेबनॉनच्या दक्षिणी किनारपट्टीवर हेझबोलाच्या विरोधात आक्रमण अधिक तीव्र केल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे इस्रायल आणि हेझबोला यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
एकीकडे हेझबोला पराभव स्वीकारायला तयार दिसत नाही, तर दुसरीकडे इस्रायलही विविध भागांवर हल्ले करत आहे. तसेच आता इस्रायलने लेबनॉनला कडक इशारा दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशातील परिस्थिती आणखी चिघळण्याची भिती देखील व्यक्त केली जातीय.