इस्रायलच्यावतीने गाझा पट्टयातील मारा सुरुच; 18 ठार

गाझा सिटी : इस्रायलने गाझा पट्टयातील मारा सुरुच ठेवला असून त्या माऱ्यामध्ये 18 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. इस्रायलने सुरू केलेल्या हवाई हल्ल्यात इस्लामिक जिहादचा कमांडर बहाहा अबु एल अत्ता आणि त्याची पत्नी मारले गेले होते.

अलिकडील दहशतवादी हल्ल्यांचा तो सूत्रधार असल्याचा दावा इस्रायलने केला होता. तेंव्हापासून काल इस्रायली समुदायाच्या वस्तीच्या जवळपास 250 रॉकेट डागली गेली, असे इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. या भागात इराणच्यावतीने केल्या जात असलेल्या छुप्या युद्धाच्या विरोधात इस्रायलने जोरदार आघाडी उघडली आहे.

गाझा पट्टयातील जोरदार धुमश्‍चक्रीमुळे इस्रायली शाळांना सुटी देण्यात आली आहे. तसेच गाझा सीमा भागातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमांनाही इस्रायलने स्थगित केले आहे. काल सकाळपासूनच इस्रायलच्या अंतर्गत भागात रॉकेटचा मारा व्हायला लागला आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यानाहू यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावली आणि हा संघर्ष अधिक चिघळवण्याची इस्रायलला काहीही ईच्छा नसल्याचे स्पष्ट केले. मात्र इरानच्या पाठिंब्यावर इस्लामिक जिहादकडून काही आगळीक झाल्यास इस्रायलच्या रॉकेटचा मारा थांबणार नाही, असा इशाराही दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.