तेल अविव – इस्त्रायल आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान थेट विमान सेवा सुरू झाली असून आज इस्त्रायलहून अबुधाबीकडे पहिल्या व्यापारी विमानाचे उड्डाण झाले ही एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे.
या विमानात इस्त्रायलचे एक उच्चाधिकार प्रतिनिधीमंडळ तिकडे रवाना झाले. त्यात इस्त्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मेईर बेन शब्बात यांचाही समावेश होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार जेर्ड कृष्नर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओबेरियन यांचाहीं या विमानात समावेश होता.
अरब देशांमध्ये इस्त्रायलचे संबंध सुरळीत होत असल्याचे हे निदर्शक मानले जात असून अमेरिकेच्या पुढाकाराने गेल्या 13 ऑगस्ट रोजी संयुक्त अरब अमिरात आणि इस्त्रायल यांच्यात थेट राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याची घोषणा करण्यात आली होती. दोन्हीं देशांमध्ये आता नियमीत दूरसंचार संपर्क आणि व्यापारी संपर्कही प्रस्थापित होत आहेत.
ही एक ऐतिहासिक घटना मानली जात असली तर अनेक अरब देशांनी या संपर्काचा निषेध केला आहे. संयुक्त अरब अमिरातीने अरब देशाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची प्रतिक्रियाहीं काही आखाती देशांनी दिली आहे.