जेरुसलेम : इस्रायलच्या सैन्याने मंगळवारी लेबेनॉनमध्ये पायदळ घुसवले आणि हिज्बुल्लाहशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे घालायला सुरुवात केली. इस्रायलच्या सीमेजवळच्या गावांमध्ये विशेषतः जेथून इस्रायली समुदायाला धोका होऊ शकतो, अशा भागांमध्ये सध्या इस्रायलचे सैन्य घुसले आहे. हिज्बुल्लाह आणि हमासला पाठिंबा देणाऱ्या इराणला इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी इशारा दिला आहे. मध्यपूर्वेत असे कोणतेही ठिकाण नाही, जेथे इस्रायल पोचू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. लेबेनॉनमधील हिज्बुल्लाहच्या ठिकाणांवर छापे घालण्यासाठी इस्रायलच्या सैन्याने रात्रीत सीमा ओलांडली होती. ही धडक कारवाई करण्याची तयारी इस्रायलकडून बऱ्याच महिन्यांपूर्वीपासून केली जात होती, हे यातून स्पष्ट झाले.
पायदळाची कारवाई जरी सुरू झाली असली, तरी हिज्बुल्लाह आणि इस्रायली सैन्यात संघर्ष होण्याचे आतापर्यंत कोणतेही वृत्त नाही. मात्र इस्रायलच्या हल्ल्यात शरणार्थ्यांच्या छावणीतले ६ ठार झाले. मंगळवारी सकाळी सिडॉनमधील ईन अल-हिल्वेह निर्वासितांच्या छावणीवर हा हवाई हल्ला झाला. इस्रायलच्या हल्ल्याला रोखण्यासाठी लेबेनॉनच्या सैन्याकडून सीमाभागात पुन्हा सैन्य तैनात केल्याचे म्हटले आहे. मात्र त्याचा तपशील जाहीर केला गेला नाही. २००६ च्या युद्धापूर्वी हे सैन्य सीमाभागात तैनात होते. नंतर ते माघारी बोलावले गेले होते. इस्रायलने लेबेनॉनमधील नागरिकांना दक्षिण लेबेनॉनमध्ये प्रवेश न करण्याचा इशारा दिला आहे.
हिज्बुल्लाहचे नेतृत्व नव्या नेत्याकडे…
लेबेनॉनची राजधानी बैरुतमध्ये केलेल्या रॉकेट हल्ल्यात हिज्बुल्लाहचा प्रमुख नेता हसन नसरल्लाहला ठार केल्यानंतर आता हिज्बुल्लाहचे प्रभारी नेतृत्व नईम कासेम याच्याकडे सोपवण्यात आले आहे. इस्रायलने हिज्बुल्लाहच्या बहुतेक वरिष्ठ कमांडरांचा खात्मा केल्यामुळे या संघटनेचे नेतृत्व कोणाकडे सोपवले जाणार याबाबत उत्सुकता होती. मारल्या गेलेल्या कमांडरांच्या जागेवर नवीन कमांडरांनी आता आघाडी सांभाळल्याचे कासेम याने म्हटले आहे.
हिज्बुल्लाहकडूनही रॉकेटचा मारा सुरू…
इस्रायली सैन्याने पायदळाची कारवाई सुरू करताच हिज्बुल्लाहकडूनही इस्रायलच्या उत्तरेकडील भागात रॉकेटचा मारा सुरू करण्यात आला आहे. त्याला इस्रायलकडूनही प्रत्युत्तर दिले जाऊ लागले आहे. यामुळे दोन्ही देशातल्या सीमाभागातल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायला पलायन केले आहे. मात्र उत्तरेकडील भागातून इस्रायली नागरिक आपल्या घरी परतू शकतात, असे इस्रायली सैन्याच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या ठरावाचा संदर्भ…
इस्रायल आणि लेबेनॉनमध्ये २००६ साली झालेल्या युद्धाला थांबवण्यासाठी सुरक्षा परिषदेने एक ठराव केला होता. सीमा आणि लितानी नदी दरम्यानच्या भागातून माघार घ्यावी, असे या ठरावात म्हटले गेले होते. मात्र दक्षिण लेबेनॉनमध्ये या ठरावाची अंमलबजावणी झाली नव्हती. म्हणूनच तेथे हिज्बुल्लाहचे दहशतवादी आणि शस्त्रास्त्रे मोठ्या संख्येने असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. आज पायदळाच्या कारवाईनंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या या ठरावाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
लेबेनॉनकडून आर्थिक मदतीचे आवाहन…
इस्रायलच्या कारवाईमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी लेबेनॉन आणि संयुक्त राष्ट्राने तातडीने ४२६ दशलक्ष डॉलरची मदत देण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला केले आहे. लेबेनॉनचे काळजीवाहू पंतप्रधान नजीब मिकाती आणि संयुक्त राष्ट्राच्या मानवतावादी मदतीसाठीचे समन्वयक इम्रान रिझा यांनी हे आवाहन केले आहे. इस्रायलच्या कारवाईमुळे १० लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. या लोकांना मदत म्हणून अन्न, मूलभूत सुविधा, आश्रय, आरोग्य सुविधा, पाणी आणि नगरपालिकेच्या सेवा देणे आवश्यक आहे, असे मिकाती यांनी म्हटले आहे.