इस्रायल अखेर शस्त्रसंधीस तयार!

जेरुसलेम  – गाझा पट्ट्यात इस्रायलने केलेल्या नव्या हवाई हल्ल्यात 26 जण मरण पावले. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि अन्य संसद सदस्यांच्या दबावामुळे शस्त्रसंधी करण्याची तयारी इस्रायलने दर्शवली असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इस्रायलने दिले आहे.

पॅलेस्टाईनमधील हमास गटाकडून होणाऱ्या रॉकेट हल्ल्यांपासून आपल्या देशवासीयांचे संरक्षण करण्याचा इस्रायलचा हक्क आहे. मात्र तरीही गेले काही दिवस सुरू असणारा हिंसाचार थांबवावा, अशी विनंती ज्यो बायडेन आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी केली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा तणाव कमी करण्याबाबत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल. हमासला त्यांच्या कुरापतीचा पुरेसा धडा शिकवला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय दबावाचाही विचार करावा लागेल, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने स्थानिक माध्यमांना नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मात्र, या शस्त्रसंधीत इजिप्तने मध्यस्थी करणे गरजेचे असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

गाझामध्ये इस्रायलने रविवारी सकाळी केलेल्या हवाई हल्ल्यात दोन लहान मुलांसह किमान 26 जण मरण पावले, अशी माहिती पॅलेस्टाईन आरोग्य मंत्रालयाने दिली. गाझातील दहशतवादी तळांवर इस्रायलने सुरू केलेल्या हल्ल्यांमध्ये हा हल्ला सर्वात संहारक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सोमवारी हा संघर्ष सुरू झाल्यानंतर 147 पॅलेस्टिनी नागरिकांचा त्यात मृत्यू झाला आहे. त्यात 47 बालकांचा समावेश आहे, तर सुमारे 1200 जण जखमी झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

दुसऱ्या बाजूला पॅलेस्टिनी बाजूने गाझामधून किमान अडीच हजार रॉकेटचा मारा इस्रायलवर करण्यात आला आहे. त्यात या ज्यू राष्ट्रामधील 10 जण मरण पावले असून, त्यात एका भारतीय महिलेचा समावेश आहे, असे वृत्त टाईम्स ऑफ इस्रायलने दिले आहे.

सध्या सुरू असणाऱ्या तणावाच्या वातावरणात हा संघर्ष पूर्ण स्वरूपाच्या युद्धात परावर्तित होण्याची भीती व्यक्‍तहोत आहे. पर्व जेरुसलेममधून अनेक पॅलेस्टिनी नागरिकांच्या स्थलांतराचे आदेश न्यायालयाने दिल्याने तेथे तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये धुमशान सुरू होण्यासाठी ठिणगी पडली.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.