जेरुसलेम – हमासबरोबर युद्धबंदी करायला इस्रायलच्या सुरक्षा विषयक मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी या करारातील तरतूदींना मान्यता असल्याचे जाहीर केल्यानंतर सुरक्षा विषयक मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या कराराच्या मसुद्याला मान्यता देण्याची शिफारस करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. युद्धबंदी इस्रायलने मान्य केल्यामुळे गेल्या १५ महिन्यांपासून सुरू असलेले गाझामधील हमास- इस्रायल दरम्यानचे युद्ध थांबवणे जाणार आहे.
तसेच हमासने ओलिस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका देखील होणार आहे. इस्रायल आणि हमासमधील चर्चेत कतार आणि अमेरिकेकडून वाटाघाटी करण्यात आल्या. हा करार निश्चित झाला असल्याचे या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी बुधवारीच जाहीर केले होते. मात्र हमासकडून अखेरच्या क्षणी अडथळे आणले जात असल्यामुळे या युद्धबंदीबाबत अनिश्चितता असल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले होते.
युद्धबंदीसंदर्भातल्या अटी आपल्याला मान्य असल्याचे हमासने म्हटले होते. पण तरिही या युद्धबंदीची अंमलबजावणी होऊ शकेल का, याबाबत गाझातील रहिवासी आणि ओलिसांच्या नातेवाईकांच्या मनात शंका होतीच.
सुरक्षा मंत्रिमंडळाने मंजूरी दिल्यामुळे या युद्धबंदीबाबतचा ठराव आता अंतिम मंजूरीसाठी इस्रायलच्या मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येणार आहे. तेथे या ठरावाला अंतिम मंजूरी मिळण्याची आशा आहे. जरी नेतान्याहू किंवा इस्रायलमधील उजव्या विचारांच्या नेत्यांकडून विरोध झाला तरी या युद्धबंदीच्या अंमलबजावणीला रविवारपासून सुरुवात होणे अपेक्षित आहे. जर नेतान्याहू यांनी विरोध केला, तर त्यांचेच सरकार अस्थिर होण्याचा धोका आहे.
दरम्यान इस्रायमधील राष्ट्रीय सुरक्षा मंत्री बेन गविर यांनी ही युद्धबंदी झाल्यास सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. ते जरी सरकारमधून बाहेर पडले तरी नेतान्याहू यांच्या सरकारला अथवा युद्धबंदीला कोणताही धोका असणार नाही. केवळ या परीक्षेच्या क्षणी इस्रायलचे सरकार अस्थिर होऊ शकते. मात्र बेन यांच्या अन्य काही समर्थकांनीही सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर नेतान्याहू यांचे सरकार पडू शकते.
हमासने २०२३ च्या ७ ऑक्टोबरला इस्रायलच्या सीमाभागात दहशतवादी हल्ला करून १,२०० जणांना ठार केले होते आणि २५० जणांचे अपहरण केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने सुरू केलेल्या सर्वंकश युद्धात आतापर्यंत ४६ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. शिवाय गाझा पट्ट्यात अपरिमित हानी झाली. मध्यपूर्वेतील तणावामुळे जगभरातून चिंता व्यक्त केली जात होती. गुरुवारी देखील इस्रायलने गाझामध्ये केलेल्या माऱ्यात ७२ ठार झाले आहेत.
तीन टप्प्यातल्या युद्धबंदीचा ठराव
युद्धबंदीतील तरतूदींनुसार ओलिसांची सुरक्षित सुटका व्हायला हवी, असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. पहिल्या टप्प्यात ३३ ओलिसांची आणि इस्रायलच्या तुरुंगातील पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका व्हायची आहे. गाझातील विविध भागांमधील इस्रायलचे सैन्यही मागे घेतले जाणार आहे. मानवतावादी मदतीसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिले जाणार आहेत. इस्रायलचे पूर्ण सैन्य मागे घेतल्याशिवाय उर्वरित सर्व ओलिसांची सुटका होणार नाही, असे हमासने म्हटले आहे.