जेरुसमेल – पॅलेस्टीनी नागरिकांच्या पाठिंब्याने सुरू झालेल्या इस्रायलविरोधी बहिष्कार आंदोलनाची पाठराखण केल्या प्रकरणी अमेरिकी कॉंग्रेसमधील दोन महिला सदस्यांना इस्रायलने त्यांच्या देशात येण्यापासून रोखले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पयांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर इस्त्रायलने हे पाऊल उचलले आहे.
अमेरिकी कॉंग्रेसमधील रशिदा तैब व इहान ओमर या दोन महिला प्रतिनिधी इस्रायल दौऱ्यावर येणार होत्या. जागतिक पातळीवर इस्रायलवर बहिष्कार घातला जावा, यासाठी पॅलेस्टिनींनी मोहीम हाती घेतली असून, या दोघींचा त्यास पाठिंबा आहे. पॅलेस्टिनी नागरिकांना इस्रायल जी वागणूक देत आहे त्याच्या या दोघीही टीकाकार आहेत. त्यांनी अत्यंत आक्रमकपणे त्याबाबतची भूमिका सातत्याने मांडली आहे. त्यातील तैब यांचे कुटुंब पश्चिम पट्टीतून अमेरिकेत स्थलांतरित झाले आहे.
या दोन महिला सदस्यांना आपल्या देशात येण्यास मुभा दिली तर तो इस्रायलचा दुबळेपणा ठरेल, असे मतप्रदर्शन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्यानंतर काही वेळातच इस्रायलने, आम्ही या दोघींना आमच्या देशात येण्याची परवानगी देणार नाही, अशी अमेरिकाधार्जिणी भूमिका जाहीर केली.