राजगुरूनगर -खेड तालुक्यात करोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात एक आयसोलेशन वॉर्ड करण्याच्या निर्णय झाला आहे. तालुक्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी एक आयसोलेशन वॉर्ड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील चाकणच्या ग्रामीण आरोग्य केंद्रासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य व उपकेंद्राला जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, सदस्य भगवान पोखरकर, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी भगवान गाढवे यांनी भेट देऊन पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यात चाकण ग्रामीण रुग्णालय, पाईट, कडूस, वाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यासह नाणेकरवाडी, मेदनकरवाडी येथील कंपनींच्या कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. आपत्तीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
निर्मला पासरे म्हणाल्या की, खेड तालुक्यात अनेक नागरिक आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. शिवाय ते मजूर, कामगार आहेत. चाकणच्या एमआयडीसी व खेड सेझव्मधील अनेक कामगार आहेत त्यांना शासनाकडून मोफत धान्य त्वरित मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
त्यांना लॉकडाऊनच्या काळात सर्व सुविधा देण्याचा ग्रामपंचायतींनी प्रयत्न करावेत. आवश्यकता भासल्यास 14 व्या वित्त आयोगातील निधी वापराच्या सूचना यापूर्वी दिल्या आहेत.
मेदनकरवाडीत 42 हजार कामगार अजूनही आहेत. लॉकडाऊन मुळे त्यांच्यावर वाईट प्रसंग आला आहे. प्रशासनाकडून त्यांना दोन वेळचे जेवण व आवश्यक सेवा सुविधा देण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडून प्रयत्न केले जात असून शासनाने जाहीर केलेली मोफत धान्य वाटप योजना तात्काळ कार्यान्वित करण्याची गरज आहे.
– अंकुश राक्षे,
सभापती, पंचायत समिती, खेड तालुका
आगामी काळात खासगी डॉक्टरांची आवश्यकता लागणार असल्याने खासगी डॉक्टरांची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. तालुक्यात सरकारी दवाखान्यात जास्त ओपीडी होत आहे. नागरिकांनी किरकोळ आजारासाठी दवाखान्यात गर्दी करू नये, आशा वारकरी व अंगणवाडी सेविकांकडून किरकोळ आजारावर गोळ्या औषधे घरपोच देण्यात येणार आहेत.
– निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद
7 हजार 310 कुटुंबाचे सर्वेक्षण
आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामाध्यमातून तालुक्यात बाहेरगावातून येणाऱ्या नागरिकांची नोंद व त्यांची तपासणी यावर लक्ष देण्यात येत डॉक्टरांना पीपीई किट देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तालुक्यात आशा वर्कर यांच्यामाध्यमातून 7310 कुटुंबाचे सर्वेक्षण केले आहे. 50 हजार 200 कुटुंबाला आतापर्यंत त्यांनी दोनदा भेटी दिल्या आहेत.
बाहरेगावचे आतापर्यंत 16 हजार 375 जण आले आहेत त्यांच्यावर आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि पोलीस पाटील आशा वर्करच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे त्यांना होम क्वारंटाइन केले जात आहे.