पुण्यातील 4 प्रभागांत करोना चाचणी केंद्र, विलगीकरण वाढवणार

पुणे – सिंहगड रस्ता, वारजे-कर्वेनगर, बिबवेवाडी आणि नगर रस्ता-वडगाव शेरी भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, या भागात प्रत्येकी एक या प्रमाणे चार अतिरिक्त करोना चाचणी केंद्रे वाढवण्यात येणार आहेत. येत्या तीन दिवसांत मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर ही केंद्रे कार्यान्वित करण्यात येतील, अशी माहिती महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

करोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येत असून, हे प्रमाणही वाढवण्याचे नियोजन केल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यापासून शहरातील नव्या करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने करोना चाचण्यांची केंद्रे वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या शहरात प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक या प्रमाणे 17 करोना चाचणी केंद्रे कार्यरत आहेत.

 

 

क्षेत्रीय कार्यालय आणि रुग्णवाढ (दि.11 ते 17 फेब्रुवारी)

  • हडपसर-मुंढवा : 233
  • सिंहगड रस्ता : 210
  • बिबवेवाडी : 203
  • वारजे-कर्वेनगर : 197
  • नगर रस्ता-वडगाव शेरी : 193

नवे करोनाबाधित वाढल्याच्या पार्श्वभूमीवर या चारही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत चाचणी केंद्रासह डॉक्टर, सहायक आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर अशा चौघांची नियुक्ती केली जाईल. येत्या तीन दिवसांत ही केंद्रे कार्यरत होणार असून, त्यामध्ये “आरटी-पीसीआर’ आणि रॅपिड अँटिजेन किटद्वारे करोना चाचणी होईल.

– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.