इस्लामपूर (प्रतिनिधी) : आम्ही नगरसेवक तुमचे नोकर आहोत का ? मागितलेली माहिती वेळेत मिळत नाही ? समितीच्या बैठकीत पदाधिकारी येतात. अन् अधिकारी लगेच निघून जातात. तर विभाग प्रमुख पाठ फिरवतात हे ठीक नाही. संबधीतांवर कारवाई करा अशी मागणी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी नगरपालिकेच्या बैठकीत केली.
सभागृहातील प्रत्येक सदस्यांचा सन्मान ठेवा. अन्यथा कारवाईला सामोरे जा असा सज्जड दम नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी यावेळी प्रशासनाला दिला. ते म्हणाले, विभाग प्रमुखांनी ठेकेदारांचे लाड करू नयेत. आरोग्य समितीच्या बैठकीत गैरहजर राहणाऱ्या संबंधित ठेकेदारांचे “त्या” एका दिवसाचे बिल रोखा.”
राजरामबापू पाटील नाट्यगृहात शुक्रवारी सकाळपासून बैठक सुरू आहे. नगरपालिका प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख वेगवेगळ्या माहिती मागितल्यावर त्या मागणी पत्राला केराची टोपली दाखवतात असा आरोप सत्ताधारी व विरोधी दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी सभेत केला. सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाच्या विरोधातील तक्रारींचा पाढा वाचला.
नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले,” कोणत्याही नगरसेवकांनी माहिती मागितली तर ती त्यांना आठ दिवसात द्यावी. त्या त्या परिस्थितीत उपलब्ध माहिती तातडीने द्यावी. मागितलेल्या माहितीची एक प्रत नगराध्यक्ष म्हणून देणे बंधनकारक आहे. आरोग्य समितीच्या बैठकीत पदाधिकारी उपस्थित राहतात. मात्र ठेकेदार उपस्थित नाही म्हणून बैठक पुढे ढकलली गेली हे बरोबर नाही.”
” आरोग्य समितीच्या सभेत अनुपस्थित असणाऱ्या संबंधित ठेकेदाराचे काम व्यवस्थित नव्हते. त्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यासाठी बैठक बोलावली होती. संबंधिताला नोटीस दिल्यानंतर त्यांने आपल्या कामात सुधारणा केली आहे.”
– अरविंद माळी , मुख्याधिकारी
नगरसेवक शकील सय्यद म्हणाले,” भुयारी गटारी संदर्भात वर्षभरात दहा स्मरणपत्र दिली. तरी माहिती दिली जात नाही हे दुर्दैवी आहे. माहिती उपलब्ध नाही. आमच्या कडे नाही अशी उत्तरे दिली जातात.”
विश्वास डांगे म्हणाले,” जशी विकास आघाडीच्या नगरसेवकांची व्यथा आहे. तीच व्यथा आमच्या राष्ट्रवादीची आहे. सभेचे इतिवृत्त मिळावे याबाबत एक महिन्यांपूर्वी पत्र दिले आहे. अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.”
विकास आघाडीचे गटनेते विक्रम पाटील यांनी ” आम्ही तुमचे नोकर नाही, सुधारणा करा अन्यथा आम्ही आंदोलन करू.” अशा इशारा दिला.