-->

इस्लामपूर : जुनी गणेश मंडई, छ. शिवाजी महाराज भाजी मंडई दोन्हीकडे सुरू राहणार

– विनोद मोहिते

इस्लामपूर : जुनी गणेश भाजी मंडई व छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई दोन्हींकडे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सोमवारी रात्री निर्णय घेण्यात आला. स्थानिक नागरिकांना व वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याचे काटेकोर पालन व नियोजन करून जुनी भाजी मंडई भरविण्याबाबच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई येथे ५० शेतकरी तर जुन्या मंडईत इतर व्यापाऱ्यांनी बसण्याचे ठरले.

या निर्णयाचे स्वागत करत शेतकरी, व्यापाऱ्यांनी करत पेढे वाटप केले. मंगळवारी सकाळी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, नगरसेवक वैभव पवार, माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांनी भेट देत व्यापाऱ्यांशी संवाद साधला. वाळवा तालुका संघर्ष समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

शहरातील गणेश भाजी मंडई नगरपरिषदेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई येथे हलविण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने भाजीपाला व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना आवाहन केले होते. यावर शेतकरी, भाजीपाला व्यापारी व वाळवा तालुका संघर्ष समितीच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांना निवेदन दिले होते. आहे त्या ठिकाणी भाजी मंडई सुरु ठेवण्याबाबत विनंती केली होती. जुन्या मंडईत भाजी विक्रेत्यांना बसू देण्यात येत नव्हते. यामुळे विक्रेत्यांनी नगरपालिका आवारात मंडई भरवली होती. यानंतर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी २२ फेब्रुवारी पर्यत जुन्या मंडईत विक्रेत्यांना बसण्यासाठी मुभा दिली होती. सोमवारी याबाबत पालिकेच्या सभेत निर्णय झाला.

जुनी गणेश भाजी मंडई गेल्या अनेक दशकापासून सकाळच्या वेळेत भरत असते. या ठिकाणी इस्लामपूर शहरासह तालुक्यातील अनेक शेतकरी व व्यापारी आपला भाजीपाला विक्रीसाठी घेवून येत असतात. शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार लक्षात घेता नगरपरिषदेने शहरात ठिकठिकाणी भाजीपाला मार्केट उभा केली आहेत. गणेश मंडईतील वाढती गर्दी पाहता, स्थानिक नागरिकांच्या अडचणी पाहता व वाहतूक कोंडी पाहता सदरची मंडई नव्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई या ठिकाणी हलविण्याबाबत नगरपालिका प्रशासनाची भूमिका घेतली होती. मात्र वाळवा तालुका संभ समितीच्या वतीने सदरची मंडई ही व्यापारी, शेतकरी व नागरिकांच्या दृष्टीने सोयीची आहे. या मंडईला अनेक दशकाचा इतिहास आहे. त्यामुळे ही मंडई आहे त्या ठिकाणीच भरविण्यात यावी भूमिका घेतली होती.

सोमवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या नगरपरिषदेच्या सभेत या बाबत चर्चा झाली. आहे त्या ठिकाणी भाजी मंडई भरविण्याबाबत निर्णय झाला. त्या परिसरातील स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, स्वच्छता राहिल. वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेत आज सोमवारी भाजी मंडई आहे त्या ठिकाणी भरविण्यात आली. सकाळी  नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी गणेश भाजी मंडई याठिकाणी भेट दिली यावेळी सकारात्मक निर्णय घेतलेल्याबद्दल शेतकरी, व्यापारी, स्थानिक नागरिक व वाळवा तालुका संघर्ष समितीच्या वतीने नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला,

यावेळी शेतकरी, व्यापारी व नागरिक यांच्याशी संवाद साधून वाहतूक कोंडी, स्वतः याची दक्षता घेण्याबाबतच्या सुचना केल्या. यावेळी नगरसेवक वैभव पवार, वाळवा तालुका संघर्ष समितीचे नेते शाकिर तांबोळी, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, भास्कर कदम, गजानन फल्ले, मन्सुर वाठारकर, हमिद अत्तर, रियाज पटेल, सुमंत कुलकर्णी, दस्तगीर मनेर, दयानंद कांबळे, विष्णु माळी आदिसह अन्य मान्यवर, शेतकरी, व्यापारी व नागरिक उपस्थित होते. वाळवा तालुका संघर्ष समितीच्या वतीने पक्ष प्रतोद विक्रमभाऊ पाटील, नगरसेवक वैभवदादा पवार, नगरसेवक शकील सय्यद, नगरसेवक प्रदिप लोहार, नगरसेविका अन्नपुर्णा फल्ले यांचे जाहिर आभार मानले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.