ग्रेटच… तरुणाईचा उत्साह..! इस्लामपुरात “माणुसकीचं नातं” ग्रुपच्या महारक्तदान शिबिरात तब्बल ६६२ जणांनी केले रक्तदान

– विनोद मोहिते

इस्लामपूर : इस्लामपूर ( जिल्हा- सांगली ) येथील “माणुसकीचं नातं” ग्रुप तर्फे एक मे महाराष्ट्रदिनी झालेल्या महा रक्तदान शिबिरात ६६२ जणांनी विक्रमी रक्तदान केले. कोविडच्या पार्श्वभूमीवर रक्त टंचाईवर मात करण्यासाठी आयोजित शिबिराला तरुणाईने उस्फुर्त प्रतिसाद दिला. इस्लामपूर शहराच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सर्वत्र लॉकडाऊन असताना पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या “माणुसकीचं नातं” ग्रुप तर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामवंत नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांतून शिबिर यशस्वी झाले.

बहे रस्त्यावरील सर्जेराव यादव हॉल मध्ये सकाळी नऊ वाजता निवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर, प्रा.शामराव पाटील, विक्रमी रक्तदान करणारे रणजीत मंत्री,विनोद मोहिते, उद्योजक सर्जेराव यादव,डॉ.एन.टी.घट्टे,डॉ. प्रवीण पोरवाल,पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख,प्राचार्य महेश जोशी प्रा. डॉ. अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

दिवस भरात सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळत रक्तदान शिबिर झाले. ग्रुपने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना आगाऊ नाव नोंदणी घेण्यात आल्याने कोणत्याही प्रकारची गर्दी झाली नाही. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ताप,ऑक्सिजन व रक्तदाब तपासणी करण्यात येत होती. महाराष्ट्र दिनी पहिल्यांदाच रक्तदान करीत आजचा दिवस ऐतिहासिक बनवण्यासाठी तरुणांनी गर्दी केली.

रक्त संकलनासाठी राजारामबापू ब्लड बँक,इस्लामपूर, मानस ब्लड बँक,सांगली, कृष्णा ब्लड बँक,कराड, डॉ.डी.वाय.पाटील ब्लड बँक,कोल्हापूर यांच्या टीमने काम केले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६६२ जणांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र, सॅनिटायझर, मास्क, माणुसकीचं नातं ग्रुप तर्फे भेटवस्तू देण्यात आली. विनोद मोहिते यांनी आपले वैयक्तिक ८१ वे रक्तदान केले.

सध्या कोविड महामारी सुरू आहे, या काळात कोविड शी लढाई तर सुरू आहेच.पण इतर अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अशा संकटकाळात सध्या रूग्णांना आवश्यक असणारे रक्त पुरवठा योग्य त्या प्रमाणात होत नसलेने त्याचे संकट आ वासून उभे राहीलेले आहे. तसेच सध्या कोविडची लस घेतलेनंतर रक्तदात्यांना साधारणतः ३ ते ४ महिने रक्त देता येणार नाही. कोविड महामारी लढाई बरोबरच रक्ताचा साठा ब्लड बँकेमध्ये असणे आवश्यक आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन नंतर आत्तापर्यत वेळोवेळी होणारी रक्तदान शिबिरे ठप्प झालेली आहेत. अनेक ठिकाणी ब्लड बँकामध्ये रक्त शिल्लक नसल्याने अत्यवस्थ रूग्णांवर प्राण गमावण्याची वेळ येत आहे. याची आवश्यकता ओळखूनच “जिथं कमी, तिथं आम्ही” या
न्यायाने “ माणुसकीचं नातं ” तर्फे हे शिबिर झाले.

या सर्व उपक्रमात विविध महाविदयालये, स्पर्धा परिक्षा केंद्रे, मेडिकल असोसिएशन, जायंटस ग्रुप,व्यायाम मंडळे, चेंबर्स ऑफ इंडस्ट्रीज, इंजिनियर्स असोसिएशन व इतर स्वंयसेवी संस्थांचा सहभाग होता.

डॉ. प्रदिप शहा, डॉ.अशोक शेंडे,डॉ.नीलम शहा, दिपक कोठावळे, उमेश कुरळपकर,पोलीस कर्मचारी संपत वारके यांच्या पथकाने रक्तदात्यांना कोणत्या अडचणी येणार नाहीत याबाबत दक्षता घेतली. प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पाटील,गौतम रायगांधी, विकास राजमाने,प्रीतम सांभारे यांनी संयोजन केले. युवा नेते राहुल महाडिक, उद्योजक व माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांनी शिबिराला भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.

विक्रमी रक्तदात्यांचा गौरव..

रक्तदान चळवळीत कार्यरत असणारे अन् विक्रमी १९७ वेळा रक्तदान करणारे रणजित मंत्री व ८१ वे रक्तदान करणारे विनोद मोहिते यांचा पुस्तके व भेटवस्तू देवून विशेष गौरव करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.