जलालाबाद – इराक आणि सीरिया या देशांतील आपली हुकुमत आणि खिलाफत गमाऊन बसलेल्या इस्लामिक स्टेट या इस्लामिक कट्टरपंथीय दहशतवादी संघटनेने आता अफगाणिस्तानात आपले हातपाय पसरवायला सुरूवात केली असून त्यांनी तेथे युवकांची संघटनेत मोठ्या प्रमाणात भरती सुरू केली आहे. त्यांनी तेथून अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांवरील हल्ल्यांचे नियोजन सुरू केले असल्याची माहिती अमेरिका आणि अफगाणिस्तानातील सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.
अफगाणिस्तानातील इस्लामिक स्टेटचे हे आव्हान तालिबान्यांपेक्षा मोठे आहे असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कारण त्या नव्या संघटनेकडे आधुनिक लष्करी क्षमता आहे. अफगाणिस्तानातील नागरी वस्ती आणि विदेशात मोठ्या प्रमाणात घातपाती कारवाया करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानातील इस्लामिक स्टेटचा प्रभाव तालिबान्यांनाहीं असह्य झाला असून त्यांनीही आता त्यांच्या विरोधात संघर्ष करण्यास सुरूवात केली आहे.
इस्लामिक स्टेटला संपवण्यासाठी तालिबानचे सहकार्य घेता येणे शक्य आहे काय यावर आता अमेरिका आणि तालिबानच्या सुरक्षा प्रमुखांनी विचार सुरू केला आहे असे सांगण्यात येते. इस्लामिक स्टेटच्या गनिमांनी काबुल आणि परिसरात अलिकडेच मोठ्या प्रमाणावर हल्ले केले आहेत त्यांची ही क्षमता पाश्चिमात्य देशांसाठीही नवी डोकेदुखी ठरू लागली आहे. युरोप आणि अमेरिकेतील त्यांची हल्ल्याची योजना कोणत्याही क्षणी अंमलात आणली जाण्याचा धोका आहे असे अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.