तालिबानवरील हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली

कैरो – दोन दिवसांपूर्वी तालिबानच्या सुरक्षा रक्षकांच्या वाहनांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकरली आहे. अफगाणिस्तानच्या पूर्व भागातील जलालाबाद शहरामध्ये भूसुरुंगाद्वारे तालिबानी लष्करी वाहने उडवून देण्यात आली होती. या हल्ल्यामध्ये किमान 8 जण ठार झाले होते.

यामध्ये बहुतेक तालिबानी लढवय्ये होते, या हल्ल्यांमागे इस्लामिक स्टेटचाच होत असल्याचा संशय सकृतदर्शनी व्यक्त करण्यात आला होता. आज इस्लामिक स्टेटशी संबंधित “अमाक न्यूज एजन्सी’ या वृत्तसंस्थेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारल्यामुळे आता या दोन कट्टरवादी संघटनांमधील वैर अधिक वाढत जाण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत.

अमेरिका आणि नाटोच्या सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेण्यापूर्वीच तालिबानने सत्तेवरील नियंत्रण मिळवले होते. नियोजनानुसार 30 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या सैन्याचे अखेरचे विमान अफगाणिस्तानातून रवाना झाले. मात्र त्यापूर्वी तालिबानने अमेरिकेबरोबर वाटाघाटी केल्यामुळे इस्लामिक स्टेट आणि तालिबानमध्ये वैर निर्माण झाले होते. दोन्ही गट इस्लामिक राज्याच्या स्थापनेचा आग्रह धरत आहेत. मात्र दोन्हीच्या कार्यपद्धतीमध्ये फरक आहे.

महिलांना घरातच थांबण्याच्या सूचना
तालिबानच्या नव्या सरकारने काबूलमधील सर्व महिलांना घरातच थांबण्याच्या सूचना केल्या असल्याचे काबूल शहराच्या नव्या हंगामी महापौरांनी सांगितले आहे. ज्या महिलांच्या जागेवर पुरुषांना नियुक्त केले जाऊ शकणार नाही, अशानाच कामावर रुजू होण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे काबूलचे हंगामी महापौर हमदुल्ला नामोनी यांनी सांगितले आहे. महिलांप्रती उदारमतवादी द-ष्टीकोण स्वाकारल्याचे तालिबानकडून भासवण्यात येत होते. मात्र आताची लक्षणे पाहता 1990 च्या काळातील कट्टरवाद अजूनही कायम असल्याचे दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.