काबूल गुरुद्वारा हल्ला प्रकरणी इस्लामिक स्टेटचा म्होरक्‍या अटकेत

काबूल- अफगाणिस्तानमध्ये गेल्या महिन्यात एका गुरुद्वारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी इस्लामिक स्टेटशी संबंधित गटाच्या स्थानिक म्होरक्‍याला अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. अस्लम फारुखी उर्फ अब्दुल्ला ओरक्राझाई असे अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या गटाच्या म्होरक्‍याचे नाव आहे. त्याच्यासह अन्य 19 जणांना अत्यंत गुंतागुंतीच्या कारवाईदरम्यान अटक करण्यात आली आहे, असे “नॅशनल डायरेक्‍टोरेट ऑफ सिक्‍युरिटी’च्या अधिकाऱ्यांनी ओळख उघड न करता सांगितले.

काबुलमधील गुरुद्वाऱ्यावरील हल्ल्यामागे फारुखी हाच मास्टर माईंड असल्याचे “एनडीएस’ने सांगितले. या हल्ल्यामध्ये 25 भाविक ठार झाले होते.

“इस्लामिक स्टेट इन द खोरासान’ नावाच्या संघटनेच्या माध्यमातून अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेटचा अजेंडा राबवला जातो. अलिकडच्या काही महिन्यांमध्ये ही संघटना तालिबानपासून फुटून वेगळी झाली. तालिबानविरोधात अमेरिकेच्या सैन्याने काही कारवाया केल्यावर “आयएस-के’ या संघटनेने स्वतःचे स्वतंत्र जाळे उभे केले.

“आयएस-के’ला नानगरहार प्रांतातून हद्दपार केल्याचे अफगाणी अधिकाऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये म्हटले होते. मात्र संघटनेने काही ठिकाणी बॉम्बस्फोटही घडवून आणले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.