इस्लामाबाद : काश्मीर प्रश्नावर जगातल्या इस्लामिक देशांची एक परिषद आयोजित केली जाणार असून त्यासाठी सौदी अरेबियाने पुढाकार घेतला असल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानी प्रसार माध्यमांमध्ये हे वृत्त प्रकाशित झाले आहे. सौदी अरेबियाचे विदेश मंत्री प्रिंस फैजल बिन फरहान यांनी पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांच्याशी झालेल्या चर्चेच्यावेळी ही माहिती दिल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
इस्लामिक सहकारी परिषदेचे सदस्य असलेल्या देशांच्या विदेश मंत्र्यांची ही स्वतंत्र बैठक काश्मीर प्रश्नावर घेतली जाणार आहे. काश्मीर प्रश्नावर इस्लामिक देशांनी आवाज उठवला पाहिजे अशी मागणी पाकिस्तानने सातत्याने केली आहे. पण त्याला सुरूवातीला थंडा प्रतिसाद मिळाला.
त्यामुळे पाकिस्तानने मोठीच आगपाखड चालवली आहे. या पार्श्वभूमीवर आता सौदी अरेबिया यासाठी प्रयत्नशील आहे असे सांगण्यात येत आहे. इस्लामिक सहकार्य परिषद ही जगातील 57 इस्लामिक देशांची संघटना आहे. त्यात पाकिस्तानही सदस्य आहे.
भारत सरकारने अलिकडेच केलेला नागरिकत्व कायदा आणि भारत सरकारकडून आणली जाणारी एनआरसीची प्रक्रिया यात भारतातील अल्पसंख्याकांना लक्ष केल जात असल्याचा कांगावाही पाकिस्तानने या संघटनेकडे केला आहे. त्यावरही या परिषदेत पाकिस्तानकडून चर्चा उपस्थित केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.