मुंबई सिटीचा बंगळुरू एफसीवर सनसनाटी विजय

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा

मुंबई  -हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) मुंबई सिटी एफसीने हिवाळी ब्रेकनंतर आपल्या मोहिमेला घरच्या मैदानावर सनसनाटी सुरवात केली. किक-ऑफपूर्वी गुणतक्त्‌यात आघाडीवर असलेल्या गतउपविजेत्या बंगळुरू एफसीवर मुंबईने एकमेव गोलने मात केली. पूर्वार्धात पोर्तुगालचा मध्यरक्षक पाऊलो मॅचादो याने केलेला गोल निर्णायक ठरला. बंगळुरूला पाचव्या मोसमात प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले. याबरोबरच त्यांना आघाडी गमवावी लागली. आता मुंबई सिटी आघाडीवर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पहिला प्रयत्न बंगळुरूने केला. एरीक पार्टालू याने मारेलला फटका मात्र बारवरून गेला. पाचव्या प्रयत्नाला इसोकोने मुसंडी मारत बॉक्‍समधून चाल रचण्याचा प्रयत्न केला, पण तो सहकाऱ्याला पास देण्यापूर्वीच गुरप्रीतने पुढे सरसावत चेंडूवर ताबा मिळविला. नवव्या मिनिटाला बॅस्तोसने प्रयत्न केला, पण त्याने जादा ताकद लावल्यामुळे फटक्‍यात अचूकता कमी होती. यावेळीही गुरप्रीतने चेंडू आरामात अडविला. गुरप्रीतने 15व्या मिनिटाला पुन्हा चपळाई दाखविली. सौविक चक्रवर्ती याच्या थ्रो-इनवर इसोकोला उजवीकडून संधी मिळाली. त्याने बॉक्‍समध्ये मोडोऊ सौगौ याला क्रॉस पास दिला होता, पण गुरप्रीतने पुढे सरसावत चेंडू आधीच टिपला.

बंगळुरूने 16व्या मिनिटाला डावीकडून प्रयत्न केला. किन लुईसने बॉक्‍समध्ये मारलेल्या चेंडूवर झिस्को हर्नांडेझ व्यवस्थित किक मारू शकला नाही. त्यामुळे चेंडू बारवरून
बाहेर गेला.

मात्र, खाते उघडण्याची शर्यत यजमान मुंबईने जिंकली. 29व्या मिनिटाला प्रतिआक्रमणावर हा गोल झाला. अरनॉल्ड इसोको याच्या हेडींगवरील बचावासह बंगळुरूची चाल फोल ठरविण्यात आली. हा चेंडू रॅफेल बॅस्तोस याच्या दिशेने गेला. त्याने मॅचादोला अफलातून पास दिला. तेव्हा मार्किंग नसल्याचा फायदा घेत मॅचादोने प्रतिस्पर्धी गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याला चकविले.

दुसऱ्या सत्रात सुनील छेत्रीला 53व्या मिनिटाला चांगली संधी होती, पण त्याचा फटका मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंगने अचूक जागी येत अडविला. सात मिनीटे बाकी असताना हरमनज्योत खाब्रा याने उजवीकडून मारलेला क्रॉस चेंडू छेत्रीच्या पायापाशी आला. तेव्हा प्रतिस्पर्ध्याचे बचाव क्षेत्र भेदून चेंडू आपल्याकडे येईल असा अंदाज छेत्रीला नव्हता. त्यामुळे अखेरच्या क्षणी हालचाल करून त्याने मारलेल्या फटक्‍यात अचूकता नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)