#ISLfootball : चेन्नईयीनशी बरोबरीमुळे जमशेदपूरच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात

चेन्नई -हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) शनिवारी येथील नेहरू स्टेडियमवर गतविजेता चेन्नईयीन एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्यातील नीरस लढतीत गोलशून्य बरोबरी झाली. याबरोबरच जमशेदपूरच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या, तर चौथ्या क्रमांकावरील नॉर्थइस्ट युनायटेडने बाद फेरीकडे आगेकूच केली. ही बरोबरी नॉर्थइस्टच्या पथ्यावर पडली.

जमशेदपूरला 17 सामन्यांत तब्बल नववी बरोबरी पत्करावी लागली असून पाच विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 24 गुण झाले. त्यांचे पाचवे स्थान कायम राहिले, पण त्यांचा एकच सामना बाकी आहे. नॉर्थइस्टचे 28 गुण आहेत. जमशेदपूरने विजय मिळविला तरी ते जास्तीत जास्त 27 गुणांपर्यंत मजल मारू शकतील. आज अनिवार्य असलेला विजय मिळविता न आल्यामुळे त्यांच्या आशा संपुष्टात आल्या. बेंगळूरू एफसी, एफसी गोवा, मुंबई सिटी एफसी आणि नॉर्थइस्ट यांनी बाद फेरीत आगेकूच केली.

या लढतीत दोन्ही संघांना मुळात अर्थपूर्ण चाली रचता आल्या नाहीत. उत्तरार्धातही गोलशून्य बरोबरीची कोंडी सुटू शकली नाही. सामन्यात दोन्ही संघांनी सावध सुरवात केली. आठव्या मिनिटाला जमशेदपूरच्या बचाव फळीने ढिलाई केली. धनचंद्र सिंगने उजवीकडे चेंडूवरील ताबा गमावला. त्यामुळे अनिरुध थापाला संधी मिळाली. त्याने मारलेला फटका सुरवातीला मारीओ आर्क्वेसने थोपविला, पण टप्पा पडल्यावर आगुस्टीन फर्नांडीसने हेडिंग केले. अखेरीस करण आमीनने जमशेदपूरचे क्षेत्र सुरक्षित राखले.

11व्या मिनिटाला थापाने घेतलेल्या कॉर्नरवर जेजे लालपेखलुआने छातीने चेंडू नियंत्रीत केला, पण आगुस्टीनने त्याला रोखले. त्याने थोपविलेला चेंडू बाहेर गेल्याने परत चेन्नईयीनला कॉर्नर मिळाला, पण जमशेदपूरने तो फोल ठरविला. 15व्या मिनिटाला चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजीत सिंग याने बॉक्‍समध्ये गोल कीकवर मारलेला चेंडू ख्रिस्तोफर हर्डच्या दिशेने गेला. त्याने उडी घेत हेडिंग केले, पण त्यातून आर्क्वेसला धडक बसली. त्यामुळे फ्री किक गेली.

तोपर्यंत दोन्ही संघ चेंडूवर ताबा मिळवून चांगल्या चाली रचण्यास झगडत होते. पहिला उल्लेखनीय प्रयत्न 21व्या मिनिटाला चेन्नईयीनच्या विनीत याने केला. जेजे लालपेखलुआ याच्याकडून उजवीकडे पास मिळाल्यानंतर त्याने थेट फटका मारला, पण जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल योग्य जागी होता. त्यामुळे त्याने चेंडू आरामात अडविला. करणजीतने 31व्या मिनिटाला आर्क्वेसचे अप्रतिम हेडींग झेप टाकत रोखले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)