हिरो इंडियन सुपर लीग : चेन्नई-बेंगळुर लढतीत जोरदार चुरस अपेक्षित

चेन्नई  – हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) शनिवारी बेंगळुरु एफसी आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात लढत होत आहे. गुणतक्त्‌यात आघाडीवर असलेल्या बेंगळुरूने कर्णधार सुनील छेत्री आणि उदांता सिंग यांना विश्रांती दिली आहे, पण चुरस कायम राहील.

बेंगळुरूने विजय मिळविल्यास त्यांचे बाद फेरीतील स्थान नक्की होईल. 14 सामन्यांतून 31 गुणांसह ते आघाडीवर आहेत. चेन्नईयीन गतविजेता असला तरी नेहरू स्टेडियमवरील लढत जिंकून बेंगळुरू आगेकूच करू शकते. गेल्या मोसमात बेंगळुरूला हरवून विजेते ठरलेल्या चेन्नईयीनची यावेळी इतकी अधोगती झाली आहे की ते तळात आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अर्थात आघाडीवरील बेंगळुरूला घरच्या मैदानावर हरविणे चेन्नईयीनसाठी महत्त्वाचे ठरेल. व्हेनेझुएलाचा दमदार स्ट्रायकर मिकू याच्या पुनरागमनामुळे बेंगळुरू संघ आणखी भक्कम झाला आहे. केरळा ब्लास्टर्सविरुद्ध तो बदली खेळाडू म्हणून उतरू शकला. दुखापतीनंतर तो तंदुरुस्त झाला आहे. त्यामुळे चेन्नईयीनविरुद्ध तो स्टार्ट करेल, तसेच त्याच्या जोडीला ल्युसीमा व्हिला हा सुद्धा मैदानात उतरेल.

बेंगळुरूचे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांनी सांगितले की, मिकू आल्यामुळे आक्रमणाचे प्रमाण सरस बनेल. आम्ही बचावावर बरेच लक्ष केंद्रीत केले आहे. सुरवातीला निशू कुमार व राहुल भेके स्थिरावत असल्यामुळे काही समस्य होत्या. आता आमचे चारही बचावपटू चांगला खेळ करीत आहेत. त्यांचे प्रयत्न तुम्ही पाहू शकता.

कुआद्रात यांचा संघ आशियाई करंडकाच्या ब्रेकपूर्वी धडाक्‍यात होता. त्यानंतर मात्र त्यांची विजयी मालिका खंडित झाली. मुंबई सिटीविरुद्ध त्यांना पहिलाच पराभव पत्करावा लागला. मग मात्र त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला 2-1 असे हरविले. मग ब्लास्टर्सविरुद्ध दुसऱ्या सत्रात झुंज देत त्यांना 2-2 अशी बरोबरी साधावी लागली.

दुसरीकडे चेन्नईयीनची घसरण वेगाने होत आहे. त्यांना 14 सामन्यांत एकच विजय मिळविता आला आहे. उरलेल्या चार सामन्यांत संघाने थोडी तरी प्रतिष्ठा कमवावी अशी अपेक्षा प्रशिक्षक जॉन ग्रेगरी बाळगून आहेत. नव्याने करारबद्ध केलेला खेळाडू सी. के. विनीत याने पहिला गोल केला. त्याने पुणे सिटीविरुद्ध ही कामगिरी केली. पूर्वी बेंगळुरू एफसीकडून खेळलेला विनीत सातत्य ठेवेल अशी त्यांना आशा असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)