बॉम्बसह आलेल्या इसिसच्या दहशतवाद्याला अटक

गोळीबारानंतर पोलिसांनी घेतले ताब्यात

उत्तर प्रदेशात अतिसतर्कतेचे आदेश

नवी दिल्ली – येथील करोल बाग ते धौल कौनदरम्यानच्या रस्त्यावर काल रात्री झालेल्या चकमकीनंतर इसिसच्या एका म्होरक्‍याला अटक करण्यात आली. त्याचे नाव अबु युसूफ खान असे आहे. त्याच्याकडून दोन विध्वंसक बॉम्ब आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले. हे बॉम्ब कुकरमध्ये ठेवण्यात आले होते. त्याची क्षमता अद्याप स्पष्ट झाली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

खानने शहरातील अनेक स्थळांना भेट दिली होती. तो एकटाच हा हल्ला घडवण्याच्या प्रयत्नात होता. धौला कौन भागातील एका इसिसच्या हस्तकाला आमच्या विशेष शाखेच्या पथकाने चकमकीनंतर अटक केली. त्याच्याकडून बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत, असे दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे उपायुक्‍त प्रमोदसिंह खुशवाह यांनी सांगितले.

दरम्यान, खानला अटक केलेल्या भागात एनएसजी कमांडो आणि बॉम्बशोधक व नाशक पथक तैनात करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशमधील सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांना अतिसतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

बंगळुरूमधून एका नेत्ररोगतज्ज्ञ अब्दूर रहमानला इसिसचा हस्तक असल्याच्या संशयावरून अटक केली. त्यानंतर काहीच दिवसांत खानला अटक झाली. अब्दूर दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी मेडिकल ऍप बनवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.