इसिसचे जाळे: एनआयएकडून वर्धा, हैदराबादमध्ये छापे

चौकशीसाठी चार संशयित ताब्यात
नवी दिल्ली – इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) ही खतरनाक दहशतवादी संघटना आपले जाळे पसरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी हैदराबादमध्ये आणि महाराष्ट्राच्या वर्ध्यात छापे टाकले. छापासत्रावेळी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

जानेवारी 2016 मध्ये अबू धाबीहून आलेल्या शेख अझर-उल्‌-इस्लाम, अदनान हसन आणि मोहम्मद फरहान शेख या तिघांना दिल्लीत अटक करण्यात आली. भारतात इसिसचे जाळे पसरवण्यासाठी तरूणांची त्या संघटनेत भरती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या गटाशी ते संबंधित असल्याचा संशय आहे. भारतात दहशतवादी कारवाया घडवण्याचा इसिसचा कट असल्याचा सुगावा लागल्यानंतर एनआयएने सखोल तपास सुरू केला. त्याचाच भाग म्हणून हैदराबादमध्ये तीन ठिकाणी आणि वर्ध्यात छापे टाकण्यात आले. त्या छापासत्रावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांच्या घरांमधून विविध प्रकारचे डिजिटल डिव्हाईसेस आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली. हस्तगत करण्यात आलेल्या डिजिटल डिव्हाईसेसमध्ये मोबाईल फोन, सिम कार्ड, आयपॅड, लॅपटॉप, वॉकी टॉकी यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.