इसिस खोरसानचा नवा म्होरक्‍या पाकिस्तानातील दहशतवादी

काबूल: इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या खोरसान या शाखेचा नवीन म्होरक्‍या पाकिस्तानस्थित हक्कानी नेटवर्कचा दहशतवादी आहे, असा आरोप अफगाणिस्तानातील प्रभारी गृहमंत्री मसूद आंद्रबी यांनी केला आहे.

हक्कानी नेटवर्क आणि तालिबानमध्ये घनिष्ठ संबंध असून या दोन्ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानमध्ये दररोजच दहशतवादी कारवाया करत असतात, असा आरोपही
आंद्रबी यांनी केला आहे. जेव्हा राजकीय कारणामुळे या संघटनांना दहशतवादी कारवाया करणे शक्‍य नसते, तेव्हा “इस्लमिक स्टेट खोरसान प्रोव्हिन्स’च्या नावाखाली या सक्रिय असतात असेही आंद्रबी यांनी म्हटले आहे.

शबाब अल्माहाजिर असे या इस्लामिक स्टेट खोरसान शाखेच्या नवीन म्होरक्‍याचे नाव असून तो हक्कानी नेटवर्कचा सदस्य आहे, असे आंद्रबी म्हणाले. मे महिन्यात अफगाणिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचे माजी प्रमुख रहमतुल्ला नबिल यांनीही पाकिस्तानातील हक्कानी नेटवर्क पश्‍चिमेतील काही भागात 9/11 सारख्या हल्ल्यांना मदत करत असल्याचा आरोप केला होता.

हक्कानी नेटवर्कची स्थापना 1980 मध्ये झाली होती आणि जलाउद्दीन हक्कानीने ही दहशतवादी संघटना उभारली होती. त्यानंतर सध्या या संघटनेचे नेतृत्व सिराजुद्दीन हक्कानी करत आहे. सध्या या संघटनेमध्ये 10 ते 15 हजार दहशतवादी सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.

हक्कानी नेटवर्कसाठी सहाय्य केल्याचा आरोप अमेरिकेने पाकिस्तानवर केला आहे. पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेले 6 ते 7 हजार दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये असून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना त्यांचा धोका असल्याचा एक अहवाल संयुक्‍त राष्ट्रानेही तयार केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.