काबूल – तालिबानने अफगाणिस्तानचे नियंत्रण मिळवण्यापूर्वीच गेल्या काही दिवसात इस्लामिक स्टेट, जैश ए मोहंम्मद आणि लष्कर ए तोयबाचे दहशतवादी मोठ्या संख्येने अफगाणिस्तानमध्ये घुसले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हे सर्व दहशतवादी तालिबानी ध्वज घेऊन अफगाणिस्तानमध्ये घुसले आहेत. तालिबानच्या म्होरक्यांना या विदेशी दहशतवाद्यांची पूर्ण माहिती आहे. हे दहशतवादी काबुल शहराच्या विविध भागांमध्ये सक्रिय आहेत. मात्र या दहशतवाद्यांवर तालिबानचे काहीही नियंत्रण नाही.
अमेरिकेबरोबर झालेल्या करारानुसार अफगाणिस्तानमध्ये विदेशी दहशतवाद्यांना स्थान न देणे आणि सर्व विदेशी दहशतवाद्यांना काही दिवसातच अफगाणिस्तानच्या बाहेर काढण्याचे तालिबानने मान्य केले आहे. मात्र हे विदेश दहशतवादी तालिबानचे आदेश झुगारण्याची शक्यता असल्याने पुढील काही दिवस तालिबानसाठी मोठ्या कटकटींचे असणार आहेत, असे तालिबानच्या राजकीय घडामडींशी संबंधित सूत्राने म्हटले आहे.
तालिबानचा संस्थापक आणि मारला गेलेला प्रमुख म्होरक्या मुल्ला ओमर याचा मुलगा मुल्ला याकूब हा सोमवारी काबुलमध्ये दाखल झाला. त्याने या विदेशी दहशतवाद्यांच्या घुसखोरीची दखल घेतली असल्याचे समजते आहे. तालिबानचे सर्व म्होरके क्वेट्टामध्येच होते. तेथूनच याकब काबुलमध्ये आला आहे.