अफगाणिस्तानमध्ये इसिस हक्कानीचे मोड्युल उद्‌ध्वस्त

काबुल – अफगाणिस्तानातील “नॅशनल डायरेक्‍टोरेट ऑफ सिक्‍युरिटी’ या गुप्तचर संस्थेने आज इसिस आणि हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनांचे केंद्र उद्‌ध्वस्त केले. दहशतवादी विरोधी कारवाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल सिक्‍युरिटी या विशेष दलाने तीन ठिकाणी कारवाई करून हे केंद्र उद्‌ध्वस्त केले.

अफगाणिस्तानच्या सुरक्षा रक्षकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधणे, त्यांच्या कारवायांना निष्प्रभ करणे, दहशतवादी अड्डे उद्‌ध्वस्त करणे आणि दहशतवाद्यांशी संबंधित धागेदोऱ्यांद्वारे त्यांचे नेटवर्क उद्‌ध्वस्त करण्यासाठी “एनडीएस’ सक्रिय आहे. त्याचाच भाग म्हणून इसिस-हक्कानीचे संयुक्‍त केंद्र उद्‌ध्वस्त करण्यात आले, असे “एनडीएस’च्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

इसिस आणि हक्कानी नेटवर्कचा शहरी भागातील समन्वयक सनाउल्लाह हा या केंद्राचा प्रमुख होता. “एनडीएस’ने केलेल्या कारवाईदरम्यान 8 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आणि अन्य 5 जण कारवाई दरम्यान ठार झाले. यावेळी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे, दारुगोळा, 82 एमएम मोर्टार, लाईट मशिन गन, 250 किलो स्फोटके जप्त करण्यात आली.

इसिस आणि हक्कानी नेटवर्कच्या या संयुक्‍त केंद्रानेच अध्यक्ष्यांच्या शपथविधीच्या समारंभावर रॉकेट हल्ला, शिखांच्या गुरुद्वारावरील हल्ला, शाहिद मझारी मशिदीवरील दहशतवादी हल्ला आणि बग्राम येथे दोन रॉकेट हल्ले केले होते. याशिवाय काबुलमध्ये काही जणांच्या हत्याही या केंद्राच्यावतीने करण्यात आल्या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.