काबूल/ नवी दिल्ली – जम्मू काश्मिरमध्ये मोठा हल्ला आणि अफगाणीस्तानातील भारतीय अस्थापनांच्या विध्वंसाचा कट इसीसने आखला होता. या संघटनेचा पाकिस्तानी गुप्तचर खात्याशी निकटचा संबंध असल्याची कबूली काबूलमध्ये गुरूद्वारावर हल्ला करण्याच्या कटाचा म्होरक्या आणि इसिसचा कुख्यात दहशतवादी अस्लम फारूकीने दिली आहे.
अस्लम फारूकीला अटक करण्याच्या मोहीमेचे नेतृत्व करणाऱ्या अफगाणीस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाचे कमांडर अहमद म्हणाले, त्यांच्या सात वर्षांच्या सेवेत ही सर्वात अवघड कामगिरी होती. सुरवातीला आम्ही कंदहारमध्ये कार्यरत असणाऱ्या स्फोटक आणि शस्त्रांचा तस्कर शाह वली याला अटक केली. त्याच्या अटकेमुळे कंदहारमधील पुढील यशाचा मार्ग मार्ग मोकळा झाला.
आम्ही सलग आठवडाभर दिवस रात्र ही मोहीम राबवली. मात्र शत्रू नागरी वस्तीत शिरल्यामुळे आम्हाला आमच्या मोहीमेचा वेग कमी करावा लागला. इसिसच्या खोरासान शाखेच्या करवाया अफगाणीस्तानमध्ये वाढल्या होत्या. त्यांनी अमेरिका तालिबान यांच्यातील शांतता करार धुडकावला होता.
यात पकडलेल्या फारूकीचे लष्कर ए तोयबा आणि हक्कानी नेटवर्कसारख्या अन्य दहशतवादी संघटनांचा निकटचे संबंध होते. तो पाकिस्तानी नागरिक आहे. त्याने लष्कर ए तोयबाच्या सुचनेनुसार कासारगोड येथील हुसेन आणि अन्य दहशतवाद्यांसह गुरूद्वारावर हल्ला घडवून आणला. त्याच्याकडे केलेल्या तपासात इसीस काश्मिरात मोठा हल्ला घडवण्याच्या तयारीत होती. या हल्ल्यासाठी आयएसआयचा पाठींबा आहे. त्याच बरोबर भारताच्या अफगाणीस्तानातील अस्थापना जमीनदोस्त करण्याचा कट रचला होता, अशी माहिती त्याने दिली आहे.
दरम्यान, नवी दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फारूकीच्या अफगाणीस्तानातील तपासावर भारतीय गुप्तचर यंत्रणा लक्ष ठेवून आहे. त्याच्याकडून अधिक माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.
केरळमधील इसिसच्या नेटवर्कवर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते काबूलच्या गुरूद्वारावरील हल्ला हक्कानी नेटवर्कने लष्कर ए तोयबाच्या मदतीने घडवून आणला आहे. काबूलच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या भागातही असे हल्ले घडवून आणण्याची क्षमता हक्कनी नेटवर्कमध्ये आहे.