इशरत जहॉं बनावट चकमक प्रकरणी वंजारा, अमीन दोषमुक्त

अहमदाबाद – इशरत जहॉं बनावट चकमक प्रकरणी गुजरातमधील सीबीआय कोर्टाने माजी पोलीस अधिकारी डी जी वंजारा आणि एन के अमीन यांना दोषमुक्त केले आहे. इशरत जहॉं बनावट चकमक प्रकरणात आमच्याविरोधात सुरु असलेला गुन्हेगारी खटला रद्द करावा, अशी मागणी या दोघांनी केली होती. त्यांनी केलेला अर्ज अखेर कोर्टाने स्वीकारला आहे.

जून 2004 मध्ये मुंबईतील 19 वर्षीय इशरत जहॉं, तिचा मित्र जावेद शेख उर्फ प्रणेश पिल्लई, अमजदअली अकबरअली राणा आणि मूळ पाकिस्तानी जिशान जौहर हे पोलिसांच्या चकमकीत ठार झाले होते. तत्कालीन पोलीस महानिरीक्षक डी जी वंजारांच्या पथकाने 15 जून 2004 रोजी अहमदाबादजवळ ही चकमक केली होती. इशरत आणि तिचे मित्र हे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याच्या मोहिमेवर असलेले दहशतवादी होते, असा दावा त्यावेळी गुजरात पोलिसांकडून करण्यात आला होता.

या चकमकीवरुन मोठा वाद झाल्यानंतर 7 सप्टेंबर, 2009 रोजी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट एसपी तमांग यांच्याकडे प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. त्यांनी 243 पानांचा अहवाल कोर्टात सोपवला. यामध्ये ही बनावट चकमक असल्याचा निष्कर्ष काढला होता. तसंच पोलिसांना थंड डोक्‍याने हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवलं होते.
परंतू, डी जी वंजारा यांच्या वकिलांनी हे आरोपपत्र चुकीचे असल्याचा दावा करत या प्रकरणात माजी अधिकाऱ्यांविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे म्हटले होते. या प्रकरणातील साक्षीदार हे पूर्वी आरोपी असल्यामुळे त्यांच्या साक्षीवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, असा दावाही आरोपींच्या वकिलांनी कोर्टात केला.

वंजारा आणि अमीन हे याप्रकरणी सध्या जामिनावर आहेत. तर सीबीआयने अमित शाह यांना 2014 मध्ये पुरेशा पुराव्यांअभावी दोषमुक्त घोषित केले होते. मात्र या प्रकरणामुळे गुजरातचे गृहराज्यमंत्री असतानाही न्यायालयाच्या आदेशामुळे आपल्याच राज्यात येण्यास त्यांना चार वर्षांसाठी बंदीला सामोरे जावे लागले होते. अमित शाह सध्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.