रुपेरी पडद्यावर अनेकदा कथानकांची गरज म्हणून कमी वयाचा नायक आणि जास्त वयाची नायिका अशी जोडी पाहायला मिळते. मनिषा कोईरालाचा एक छोटीसी लव्हस्टोरी हा चित्रपट सर्वांच्याच लक्षात असेल. त्यावेळी या चित्रपटाबरोबरच नायक-नायिकांची बरीच चर्चा झाली होती. आता तशाच पद्धतीनेअभिनेत्री तब्बू एका किशोरवयीन नायकासोबत झळकणार आहे. इतकेच नव्हे तर पडद्यावर त्यांचा रोमान्सही पाहायला मिळणार आहे. अर्थात हे सारं घडणार आहे एका वेबसीरीजमध्ये.
बॉलीवूडचा अभिनेता इशान खट्टर आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या वेबसीरीजचे नाव आहे ए सुटेबल बॉय. या वेबसीरीजचा फर्स्ट लूकही नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकौंटवर इशानने तो शेअरही केला आहे. त्यावरुन या वेबसीरीजमध्ये इशानने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची व्यक्तिरेखा साकारल्याचे दिसत आहे.
हा कॉलेजगोईंग तरुण एका वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेचे सौंदर्य पाहून मंत्रमुग्ध होऊन जातो. ही व्यक्तिरेखा तब्बूने साकारली आहे. इशानने मान नामक एका अतिश्रीमंत घरातील मुलाची भूमिका केली आहे. राजकारणातील नेता असणाऱ्या आपल्या वडिलांवर हा मान जराही खुश नाहीये. त्यामुळे त्याला आपल्या आयुष्याचा आनंद लुटायचा आहे. यासाठी तो सईदाबाई नावाच्या एका वेश्येकडे आकर्षितहोतो, असे काहीसे याचे कथानक आहे.