“हा फक्त अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का?”; अविनाश भोसलेंवरील कारवाईवरून अंजली दमानियांचा चिमटा

मुंबई : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने नुकतीच कारवाई केली.  परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणात ईडीने अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली जप्त केली आहे. दरम्यान हा फक्त अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का? अशी शंका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे.

“अविनाश भोसले अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त करत केलेल्या कारवाईवरुन भाजपा किंवा केंद्राकडून आदेश मिळाल्यानंतर ईडी कारवाई करतं हे स्पष्ट दिसत आहे. सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणांचा वापर सतत होताना दिसत आहे,” अशी टीका अंजली दमानिया यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.

“सध्याच्या घडीला शिवसेनेसोबत ‘प्लॅन ए’ प्रमाणे बोलणी करत असतील तर ‘प्लॅन बी’ तयार असावा यासाठी ते अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यामध्ये किळसवाणं राजकारण आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळाली पाहिजे हे त्यांचं ध्येय आहे,” अशी टीकाही अंजली दमानिया यांनी भाजपावर केली आहे.

अंजली दमानिया यांनी ट्वीटदेखील केले असून म्हटले आहे की, “अविनाश भोसले यांची मालमत्ता ईडीकडून सील? हा फक्त अजित पवारांवर दाबाव आणण्याचा प्रयत्न आहे का?खरंतर हे व्हायलाच हव, पण ईडी हे भाजपाला सत्ता मिळवून देण्यासाठी करत आहे. अजित पवारांवर व अविनाश भोसले यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई केली असती तर खरंच आनंद झाला असता”.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.