दखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का?

जगदीश देशमुख

शिक्षण हे “उत्तम माणूस’ घडावा यासाठी असते. माध्यम कुठलेही असो, इंग्रजी असो वा मराठी मात्र संस्कार, शारीरिक व मानसिक सक्षमता, नैतिक मूल्य, व्यवहारज्ञान, सामान्यज्ञान, जीवन जगण्यासाठी लागणारी कौशल्ये यांचा विकास शिक्षणातून व्हायला पाहिजे.

कुठल्याही पालकाला तुम्ही तुमच्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत का पाठवता, असा प्रश्‍न विचारला की, त्यांची यावर उत्तरे असतात- आमच्या सोसायटीतील सगळीच मुले इंग्रजी माध्यमात शिकतात, मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पटसंख्यांच नाहीये, मुलगा/मुलगी मराठी माध्यमात शिकत असतील तर समाजात आपल्याला कमी लेखतात, इंग्रजी माध्यमात शिकल्याने उच्च शिक्षण घेण्यासाठी सोपे जाते, इंग्रजी ज्ञानभाषा आहे, त्यामुळे इंग्रजी माध्यमात शिकल्याने नोकरी लवकर मिळते, इंग्रजी ही जगाची भाषा आहे, इंग्रजी भाषा आल्याशिवाय मुलांची प्रगती होत नाही.

खरंच पालकांची ही उत्तरे समर्पक आहेत का? चला आज पालकांच्या उत्तरांवर, प्रत्युत्तरे शोधू या.

जगातील मुख्य विकसित देशांचे उदाहरण घेतले तर हे दिसून येते की त्यांच्या देशात त्यांच्याच भाषेचा वापर मुख्यत्वे करून केला जातो. रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन हे जगातील बलाढ्य व आर्थिक महासत्ता गणले जाणारे देश आहेत. यापैकी कोणत्याही देशात इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही परकीय भाषेला मुख्य आणि महत्त्वाचे स्थान नाही. म्हणजेच प्रगती होण्यासाठी इंग्रजी भाषा एकमेव पर्याय आहे. हे पालकांचे उत्तर निकाली निघायला काही हरकत नाही.

जगात एकूण 2 हजार 700च्या आसपास भाषा आणि 7 हजारांच्यावर बोलीभाषा आहेत. जगात क्रमाने सर्वांत जास्त चिनी, स्पॅनिश, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलल्या जातात. चिनी भाषा जगात सर्वाधिक बोलली जाते, या माहितीनुसार आपल्याला जगाची भाषा आपल्या मुलाला शिकवायची असेल तर त्याला चीनी किंवा स्पॅनिश भाषा शिकवावी लागेल.

इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे हे खरे आहे. आयटी कंपन्यांमध्ये काम करताना कॉम्प्युटर पासून ते गाड्यांच्या नावांपासून ते पार्टपर्यंत सगळी नावे ही इंग्रजीमध्ये आहेत. पण फक्‍त ही इंग्रजी नावे शिकण्यासाठी आपल्या 3 वर्षांच्या मुलाला बालपण जगू न देता जुनिअर केजीला पाठवणे योग्य आहे का? इंग्रजी भाषा ही नंतरही शिकता येते.
शिक्षणतज्ज्ञ व भाषातज्ज्ञ यांनी संशोधनाच्या आधारावर स्पष्ट केले आहे की, मुलाच्या शिक्षणाची सुरुवात ही मातृभाषेतूनच व्हायला पाहिजे. विविध विषयातील संबोध हे नव्याने शिकायला त्यांना जड जातात. अजून परदेशी भाषेतून शिकताना त्यांना ते आणखीच जड जातात. म्हणून इतर भाषा या कालांतराने शिकवाव्या. नाहीतर भाषा शिकण्याच्या आणखी एका आव्हानाला त्यांना तोंड द्यावे लागते. मग आपली इंग्रजी माध्यमाची मुले ही उच्च शिक्षण घेण्यासाठी तितकी सक्षम तर राहिली पाहिजेत. नाहीतर इंग्रजी माध्यमात शिकल्याने उच्च शिक्षण घेणे सोपे जाण्याऐवजी कठीण जाऊ शकते.

मराठी भाषेचा इतिहास समृद्ध आहे, ज्ञानेश्‍वर महाराजांपासून ते आतापर्यंत. त्यामुळे मराठी भाषा कमी दर्जाची नसून वैभवशाली आहे. मराठी माध्यमात शिकणारा म्हणजे कमी दर्जाचे, असे वातावरण तयार करायला जबाबदार कोण आहे, तर पालक आणि समाज. मराठी माध्यमातील शाळांच्या कमतरतेबद्दल आपण जेवढे बोलतो, लिहितो तेवढे इंग्रजी माध्यमातील कमतरतेबद्दल बोलतो का? लिहितो का? किती खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षक आहेत. किती इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांकडे सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडावा म्हणून पाहतात. केवळ पायाभूत सुविधा पाहून मुलांचे भविष्य घडू शकत नाही. पण याविषयी पालक “ब्र’ही काढत नाही. मराठी माध्यमांच्या कमतरतेबद्दल मात्र व्याख्याने आयोजित करतील. म्हणजेच मराठी माध्यमाचा दर्जा कुणी कमी केला तर आपणच.

जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळा नव्हत्या, तेव्हा आज मुलांना इंग्रजी मध्यमामध्ये घालणारे पालक कुठे शिकलेत. ज्यांना इंग्रजी माध्यमे परवडत नाहीत ते आपली मुले मराठी माध्यमामध्ये घालतात अशी समाजाची मानसिकता कुणी बनवली. त्यामुळे मराठी माध्यमामध्ये विद्यार्थी नाहीत. विद्यार्थी नाहीत म्हणून शिक्षकही विद्यार्थांकडे फारसे लक्ष देत नाहीत. परिणाम मराठी शाळा ओस पडू लागल्या आहेत.

मराठी माणसांवर काही कौटुंबिक संस्कार असतात. कुठल्याही वृद्धाश्रमात बघा मराठी आजीआजोबा संख्येने कमी सापडतील. आता हे प्रमाण इंग्रजी माध्यमाच्या परिणामांमुळे वाढत चाललंय. आपल्या सोसायटीमधील शेजारी नवराबायको दोन्ही नोकरीला असतात. मुलांना सांभाळायला कोणी नसते. आजीआजोबा असू शकतात पण ते वृद्धाश्रमात असतात. म्हणून आपल्या मुलाला ते जास्तीत जास्त आणि लहान वयात स्कूलमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात. आज मुलांचे आजीआजोबा वृद्धाश्रमात आहेत. उद्या तुम्ही असाल वृद्धाश्रमात आणि मुलगा परदेशात. म्हणून सोसायटीतील सगळी मुले इंग्रजी शाळेत आहेत म्हणून आपणही आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमात घालणे योग्य आहे का? ज्ञानाच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत.

नवनव्या संकल्पना, नवीन विचार, आपल्या पाल्यामध्ये कशाप्रकारे रुजतील याचा विचार व्हायला पाहिजे. सर्वच विद्यार्थी कुशाग्र बुद्धीची नसतात. कुणाची भाषिक, कुणाची सांख्यिकी बुद्धिमत्ता तर कुणी शारीरिक क्षमतेत तरबेज असतात. अशा वेळी फक्‍त आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा आम्हाला इंग्रजी माध्यमातून शिकायला मिळाले नाही, मग मुलांना तरी मिळेल, या हट्टापायी त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे चुकीचे ठरेल.

मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण हे हृदयापर्यंत भिडणारे असते, तर अन्य भाषेतील शिक्षण हे मेंदूपर्यंतच मर्यादित राहते. इंग्रजीसह जगातील जे जे उत्तम आहे ते मिळवावे. स्वतः उन्नत व्हावे आणि मराठी भाषेलाही उन्नत करावे. मराठी ही ज्ञानभाषा होईल यासाठी प्रयत्न करावेत. फक्‍त इंग्रजी भाषा शिकण्यासाठी महागडे इंग्रजी माध्यम निवडण्याची खरंच गरज आहे का? शेवटी पाल्य आपलं आहे त्याच्या भविष्याची काळजी आपल्याला नक्‍की असणारच.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)