चालायला रस्ता देता का… कोणी रस्ता…

वडगावशेरी येथे चारही बाजूने खोदाई; नियोजन शून्य कामाविषयी कॉंग्रेसची तक्रार

वडगावशेरी – वडगावशेरी मधील प्रभाग 5 मध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. परंतू, हे काम करीत असताना संपूर्ण रस्ताच खोदण्यात आला असून चालण्याकरीताही रस्ता सोडलेला नाही. सर्वच रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने पर्यायी रस्तेही नसल्याने पदपथावरूनही वाहने नेत असल्याने नागरिक कसाबसा चालणेही कठीण झाले आहे. यातून नागरिकांची मोठी अडचण होत आहे. रस्ता खोदल्याने किरकोळ अपघातातून दुखापतीचे प्रकार वाढले आहेत.

वडगावशेरीत रस्ते खोदण्यात आलले असताना अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने कोंडी होत आहे. विकसकामांना नागरिकांचा विरोध नाही. प्रभाग 5च्या नगरसेवकांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. परंतू, ठेकेदारांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे नागरिकांना अडचणीला समोरे जावे लागत आहे.

सहाय्यक आयुक्त नगररोड क्षेत्रीय कार्यालयाकडे याबाबत कॉंग्रेसचे प्रभाग 5चे अध्यक्ष रवींद्र उकरांडे यांनी लेखी निवेदनामार्फत अनेक मागण्या केल्या आहेत. रस्त्याचे काम करीत असताना नियोजन करण्यात आलेले नाही. एक ठिकाणावरील काम पूर्ण होऊ न देता दुसऱ्या ठिकाणी रस्ता खोदण्यात येत आहे. यामुळे अशा रस्त्याची कामे संथगतीने सुरू असून अशा नियोजन शून्य कामामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वॉर्डन बॉयची नेमणूक करण्यात यावी, काम सुरू असल्याबाबतची माहिती तसेच धोकादायक सूचनांचे फलक योग्य त्या ठिकाणी लावण्यात यावेत, रस्त्याच्या बाजूला बॅरिकेट्‌स लावावेत, रात्रीच्या वेळी रिफ्लेक्‍टर व वीज लावण्यात यावी, मोठ्या व जड वाहनांना रात्रीच्या सकाळी 8 ते 11 व सायंकाळी 5 ते 8 या वेळेत येथील रस्त्यांवर बंदी घालावी, अशा मागण्या कॉंग्रेसकडून करण्यात आल्या आहेत.

याबाबत कॉंग्रेसचे सरचिटणीस करीम शेख यांनी सांगितले की, या नियोजन शून्य विकासकामांचा नागरिकांना त्रास या भागातील नागरिकांना किती होतो याची जाणिव आम्हाला आहे. काही ठिकाणी काम नसताना रस्ते अगोदरच खोदून ठेवण्यात आले आहेत,तर काही ठिकाणी काम संथगतीने सुरू आहे. रस्त्याचे काम टप्याटप्याने गरजेचे असताना संपूर्ण रस्ता एकाच वेळी खोदून ठेवण्यात आला आहे. यातून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्याचे काम करण्यात येत आहे. सध्या, रस्त्याचे काम सुरू आहे त्याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. रस्त्याच्या कामातून त्रास होत असल्याची कोणतीही तक्रार अद्याप आलेली नाही. नागरिक विकासकामाला साथ देत आहेत. नागरिकांच्या विकासाठी मी सतत काम करत राहीन.
– योगेश मुळीक, नगरसेवक (प्रभाग 5)


विकासकामाला विरोध नाही पण जे नियोजन शून्य काम सुरू आहे, त्याला विरोध आहे. नियोजन न ठेवता अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना त्रास होतो असून याबाबत आम्ही काही उपाय सुचवले आहेत, त्यावर संबंधीत अधिकाऱ्यांनी विचार करावा, अशी आमची मागणी आहे.
– रविंद्र उकरांडे, कॉंग्रेस अध्यक्ष (प्रभाग 5)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.