खरंच स्त्री स्वतंत्र आहे?

स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेल्या अनेक परंपरा या स्त्रियांना कमी दर्जाची वागणूक देणाऱ्या, स्त्री-पुरुष भेदभावांवर आधारलेल्या असल्या तरीही आता हळूहळू काळ बदलतोय. स्त्री-पुरुष समानता काही अंशी का होईना पण आकार घेऊ लागली आहे आणि अशा या सुधारणेकडे वाटचाल करत असणाऱ्या समाजात अजूनही स्त्री अन्याय आणि स्त्री-पुरुष भेदभाव अशा गोष्टी सतत कानावर येत असतात.

याला जबाबदार कोण? समस्त पुरुषवर्ग, समाज का पूर्वापार चालत आलेल्या रुढी-परंपरा? नाही! माझ्या मते याला स्त्रीच जबाबदार आहे. अजूनही प्रत्येक स्त्री ही घर, संसार, समाज आणि रुढी- परंपरा यांमध्ये गुरफटलेली आणि घुसमटलेलीच दिसते. अजूनही ती बुरसटलेल्या विचारांच्या विळख्यात अडकलेलीच आहे.

खरं बघायला गेल्यास प्रत्येक स्त्री ही सर्वच रूपाने शक्‍तिशाली आहे, स्वावलंबी आहे; परंतु तिच्यावर अजूनही गंज चढलेल्या रुढींचा इतका दबाव आहे की ती स्वतःला हवे तसे, मनमोकळेपणाने जगायलाच घाबरते. एखादी गोष्ट तिने तिला हवी तशी केल्यास, तिला आपण चुकलो तर नाही ना अशी शंका वाटायला लागते. ती तिच्या आवडी निवडी, छंद, तिच्यातील क्षमता आणि कालांतराने तिचे अस्तित्वच हरवून बसते.

या सगळ्या गोष्टींनी ती मानसिकरीत्या तर खचून जातेच; परंतु बाळंतपणानंतर बेढब झालेल्या शरीरामुळे व त्यावरून सतत ऐकायला मिळणाऱ्या टोमण्यांमुळे ती आतून पोखरते आणि आत्मविश्‍वास गमावते. बऱ्याच जबाबदाऱ्या आणि कामे ती स्वतःवर ओढवून घेत असते. याचा अनेक वेळा अनुभव येतो. परंतु संसारातील जबाबदाऱ्या तिने वाटून घेतल्यास तीही स्वछंदपणे राहू शकेल.

तसेच आजच्या या बदलत्या काळात बऱ्याच गोष्टी समाज स्वीकारू लागला आहे. अशावेळी आताच्या प्रत्येक स्त्रीने तुटलेल्या नदीच्या बांधाप्रमाणे कोंदटलेपणाचा बांध तोडून मनसोक्‍तपणे वाहात राहिले पाहिजे. आपले छंद तिने जोपासले पाहिजेत. यामुळे ती आनंदी राहू लागेल व स्वतः आनंदी राहिली तरच तिचे कुटुंबही आनंदी ठेवू शकेल. तसेच आजचा बहुतांशी पुरुषवर्ग हा स्त्रियांना आपल्या खांद्याला खांदा लावण्यासाठी स्वतः तयार आहे. त्यामुळे परंपरागत आलेले अबला, बिच्चारी हे स्वतःवरील शिक्‍के काढून स्त्रीने मुक्‍तपणे विहार केला पाहिजे.

सतत रडत कुढत इतर स्त्रियांशी तुलना करत राहण्यापेक्षा स्त्रीने स्वतःचा शोध घेणे व स्वतःचा तसेच इतर स्त्रियांचा आदर करणे गरजेचे आहे. संसार व आत्मानंद यामध्ये स्त्रीने समतोल राखल्यास निम्म्याहून अधिक गोष्टी तिच्यासाठी सुलभ होऊ लागतील. इतरांसाठी जगण्यातल्या अनंदाबरोबरच स्त्रीने वैयक्‍तिक आनंदही भरभरून उपभोगला पाहिजे. केवळ राहणीमानातच नव्हे तर विचारांमध्येही आधुनिकपणा आणला पाहिजे. सतत स्वतःला बंधनात जखडून न घेता स्वतःची दिशा स्वतः ठरविली पाहिजे. कधीतरी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल केली पाहिजे. यामुळे स्त्री निर्भयपणे आयुष्य जगू शकेल. अशा पद्धतीने जगणाऱ्या आणि जगायची इच्छा असणाऱ्या माझ्या सर्व विरंगी सख्यांना खूप खूप शुभेच्छा…

– मृणाल मापुस्कर

Leave A Reply

Your email address will not be published.