मुंबई : परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा दावा खोडून काढला आहे. अनिल देशमुख १५ ते २७ फेब्रुवारी होम आयसोलेशनमध्ये होते असा दावा पवारांनी केला होता. त्यावरून पवारांचा दावा खरा की खोटा अशी चर्चा सुरू झाली होता. त्यावर अनिल देशमुख यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगून आपली बाजू स्पष्ट केली आहे.
शरद पवारांनी केलेल्या दाव्यानंतर भाजपा नेत्यांनी अनिल देशमुख यांचे जुने ट्विट नव्याने शेअर करत शरद पवार खोटं बोलत असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही देशमुखांचे ते ट्विट शेअर केले. यावर देशमुख यांनी ट्विटरवर पोस्ट करून आपली बाजू मांडली.
देशमुख म्हणाले की, कोविडमुळं मी नागपुरमधील रुग्णालयात ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान दाखल होतो. १५ फेब्रुवारीला मला रुग्णालयातून सुट्टी मिळाली. मी रुग्णालयाच्या बाहेर पडलो, त्याचवेळी मला पत्रकारांनी गाठलं. माझ्या अंगात त्रान नसल्यामुळे मी खुर्चीवर बसून पत्रकारांशी बोललो. त्यानंतर १५ ते २७ या कालावधीत मी होम क्वारंटाईन होतो. २८ फेब्रुवारी रोजी मी पहिल्यांदा घराच्या बाहेर पडल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केलं.