सहकारनगर, दि. 2 (प्रतिनिधी) -पुणे महानगर परिवहन म्हणजेच पीएमपीचे दररोजचे उत्पन्न एक कोटी 50 लाख रुपये आहे, त्यापैकी 90 लाख रुपये ठेकेदारांच्या बसमधून मिळतात. मात्र, ठेकेदारांच्या 850 बससाठी पीएमपीला दरोज एक कोटी 50 लाख रुपये द्यावे लागतात. आवश्यकता नसताना पीएमपी सात मीटर लांबीच्या 399 बस ठेकेदाराकडून भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत, यासाठी ठेकेदारांना दररोज 32 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. पीएमपी लोकसेवेसाठी काम करते की, ठेकेदारांसाठी?, असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
पीएमपीची एकूण बस संख्या 1650 पन्नास आहे, त्यामध्ये ठेकेदारांच्या 850 बसेस आहेत. पीएमपीच्या मालकीच्या बसेस 800 आहेत. दररोजचे उत्पन्न सरासरी दीड कोटी रुपये आहे, तर 10 ते 11 लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र, हा सगळा पीएमपीचा डोलारा खासगी ठेकेदारांसाठी राबत आहे. काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, गरज नसताना ठेकेदारांकडून बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. या बसच्या भाडेपोटी ठेकेदारांना वाढीव दराने पैसे दिले जातात. यामुळेच पीएमपी दिवसेंदिवस तोट्यात चालली आहे. पीएमपीचा एका वर्षाचा संचित तोटा 710 कोटी इतका झाला आहे, तरी पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याबाबत पीएमपी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिक्रीया मिळू शकली नाही.
पीएमपी कडून गरज नसताना जर बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या जात असतील तर ही बाब चुकीची आहे. प्रशासनाने याबाबत नागरिकांना माहिती द्यावी. प्रवाशांच्या हितासाठी मनसे नेहमीच जागरूक आहे. गैरप्रकार आढळल्यास आंदोलन करू.
– जयराज लांडगे, पुणे शहर उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना