लखनौ – उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि बसप या महत्वाच्या राजकीय पक्षांची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. त्यामुळे त्या पक्षांना विधानभवनात कार्यालयांसाठी दालने मिळवणेही अवघड जाणार आहे.
उत्तरप्रदेशात विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. त्यातील किमान 1 टक्का किंवा 4 जागा मिळवणाऱ्या पक्षांनाच नियमानुसार विधानभवनात कार्यालयांसाठी दालने उपलब्ध होतात. त्या निकषांत कॉंग्रेस आणि बसप हे पक्ष बसत नाहीत. कॉंग्रेसला यावेळी केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले.
तर, बसपच्या पदरी फक्त 1 जागा आली. अर्थात, संख्याबळाच्या दृष्टीने लहान ठरलेल्या पक्षांना कार्यालयांसाठी दालने उपलब्ध करण्याचा अधिकार विधानसभेच्या सभापतींना आहे. त्यांनी अनुकूलता दर्शवली तरच कॉंग्रेस आणि बसपला कार्यालयांसाठी दालने मिळू शकतील.
मागील वेळी केवळ 1 जागा जिंकू शकणाऱ्या राष्ट्रीय लोक दलाला विधानभवनात कार्यालयासाठी दालन मिळाले नव्हते. यावेळी 8 जागा जिंकल्याने दालन पदरात पाडून घेण्यासाठी तो पक्ष पात्र ठरला आहे.