बंगळुरू – कर्नाटकातील येडियुरप्पा सरकारने 21 हजार 473 कोटी रूपयांचा पाटबंधारे घोटाळा केला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचेच एक आमदार ए. एच. विश्वनाथ यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, येडियुरप्पा यांचे पुत्र व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र हे सरकारच्या कामात सतत हस्तक्षेप करीत असून त्यांचाही अनेक गैरप्रकारांना फूस आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
राज्यातील पाटबंधारे घोटाळ्याच्या संबंधात माहिती देताना त्यांनी म्हटले आहे की यापैकी 20 हजार कोटी रूपयांच्या कामांना अर्थविभागाची अनुमती न घेताच मंजुरी देण्यात आली असून त्याचा प्रस्ताव बोर्डाच्या बैठकीपुढेही सादर केला गेलेला नाही.
अत्यंत घाईगडबडीत या कामांची टेंडर्स काढण्यात आली आहेत. आज एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला. विश्वनाथ हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधी गटातील आमदार म्हणून ओळखले जातात, त्यांनी येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात बदल करण्याची मागणी या आधीच केली आहे. वरील टेंडर्स ज्या घाईगडबडीत काढण्यात आली आहेत त्यात कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणात दलाली मिळवण्याचा प्रकार झाला आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
विश्वानाथ हे विधान परिषदेचे सदस्य असून ते मुळचे जेडीएस पक्षाचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते म्हणाले की येडियुरप्पा यांच्या पुत्राने सध्या राज्याच्या राज्यकारभारात हस्तक्षेप चालवला आहे त्याच्या विरोधात पक्षाच्या मंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपचे केंद्रीय निरीक्षक अरूण सिंह हे कर्नाटकातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी बंगळुरात आले असतानाच विश्वनाथ यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट केल्याने भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.