बॉलीवूडमधील दिवंगत अभिनेता इरफान खान हे भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानले जातात.
आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इरफानचा “दुबई रिटर्न’ हा चित्रपट यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
खरं तर या चित्रपटाची निर्मिती 2005 साली करण्यात आली होती. परंतु डिस्ट्रीब्युटर न मिळाल्यामुळे हा चित्रपट केवळ फिल्म फेस्टिव्हलमध्येच दाखवला गेला होता.
मात्र आता 15 वर्षांनंतर हा चित्रपट सर्व प्रेक्षकांसाठी यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
“दुबई रिटर्न’ हा एक विनोदीपट आहे. आदित्य भट्टाचार्यने या चित्रपटाची निर्मिती केली होती.
या चित्रपटात इरफानसह रितू शिवपुरी, विजय मौर्या, रझाक खान यांनी निर्णायक भूमिका साकारल्या आहेत. हे सर्व कलाकार त्याकाळी नवे होते. त्यामुळे “दुबई रिटर्न’ला डिस्ट्रीब्युटर मिळत नव्हता.
मात्र इरफानच्या निधनानंतर अचानक या चित्रपटाची मागणी वाढली. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म या चित्रपटाचे हक्क निर्मात्यांकडे मागू लागले.
परंतु त्यांनी कुठल्याही ओटीटी प्लॅटफॉर्म ऐवजी सर्वांसाठी यूट्यूबवर मोफत हा चित्रपट उपलब्ध केला आहे. दरम्यान, काही तासांत 50 हजारांपेक्षा अधिक प्रेक्षकांनी या चित्रपटाचा आनंद घेतला आहे.