चेन्नई -कर्णधार डेव्हिड वॉर्नर व मनीष पांडे यांच्यासह अन्य फलंदाजांनी केलेल्या अत्यंत बेजबाबदार फलंदाजीमुळे सनरायझर्स हैदराबादला आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूविरुद्धचा हातात असलेला सामना गमवावा लागला.
विजयासाठी 150 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादने थाटात सुरुवात केली होती. कर्णधार वॉर्नर व पांडे यांनी बेंगळुरूच्या गोलंदाजीवर वर्चस्व राखताना आक्रमक फलंदाजी केली. सलामीवीर वृद्धिमान साहा लवकर बाद झाल्यानंतर वॉर्नर व पांडे यांनी दुसऱ्या गड्यासाठी 83 धावांची भागीदारी करत विजयाकडे वाटचाल सुरू केली.
वॉर्नरने अर्धशतक फटकावल्यावर अनावश्यक फटका मारत आपली विकेट गमावली. जॉनी बेअरस्टो, पांडे व अब्दुल समद हे तीनही फलंदाज शाहबाज अहमदच्या एकाच षटकांत बाद झाले व तिथेच सामन्याला नाट्यमय कलाटणी मिळाली. त्यानंतर त्यांचे फलंदाज केवळ आयाराम गयाराम पद्धतीने बाद होत गेले व कोहलीच्या संघाने अवघ्या सहा धावांनी विजय मिळवला.
तत्पूर्वी, जेसन होल्डर व रशिद खान यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएल स्पर्धेतील सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगळुरूला 8 बाद 149 धावांवर रोखले.
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत बेंगळुरूला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय अत्यंत योग्य ठरला. कर्णधार विराट कोहलीने बेंगळुरूच्या डावाची सुरुवात केली. मात्र, त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले.
खुद्द कोहलीही स्थिरावल्यानंतर स्वस्तात बाद झाला. त्याने 29 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहता आले नाही. मॅक्सवेलने यंदाच्या स्पर्धेत पहिलेच अर्धशतक फटकावताना 59 धावांच्या खेळीत 53 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 3 षटकार फटकावला.
मिस्टर 360 एबी डीविलियर्स व आक्रमक देवदत्त पडीक्कल यांनाही अपयश आले. वेस्ट इंडिजचा जेसन होल्डरने हैदराबादकडून भेदक गोलंदाजी करताना कोहली, मॅक्सवेल यांच्यासह प्रमुख फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या बाजूने रशिद खानने डीविलियर्स व वॉशिंग्टन सुंदर यांना बाद करत बेंगळुरूच्या फलंदाजीतील हवाच काढून घेतली.
काएल जेमिसनने मॅक्सवेलच्या साथीत थोडीफार चमक दाखवल्याने त्यांना 8 बाद 149 धावा अशी मजल मारता आली. हैदराबादकडून होल्डरने 3 तर रशिद खानने 2 गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन व शाहबाद नदीम यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
आयपीएल स्पर्धेतील हा सहावा सामना असून बेंगळुरूने पहिला सामना जिंकला होता. हैदराबादला पहिल्या सामन्यात कोलकाताकडून पराभव पत्करावा लागला असल्याने त्यांना या सामन्यात विजयाची गरज होती.
संक्षिप्त धावफलक –
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 8 बाद 149 धावा. (ग्लेन मॅक्सवेल 59, विराट कोहली 33, काएल जेमिसन 12, जेसन होल्डर 3-30, रशिद खान 2-18, भुवनेश्वर कुमार 1-30, टी. नटराजन 1-32, शाहबाद नदीम 1-36). सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 9 बाद 143 धावा. (डेव्हिड वॉर्नर 54, मनीष पांडे 38, शाहबाज अहमद 3-7, हर्षल पटेल 2-25, महंमद सिराज 2-25, काएल जेमिसन 1-30).