बारामती – भारतात पहिल्यांदाच गोवा येथे (दि. 20) झालेल्या आयर्नमॅन 70 बाय 30 या आंतरराष्ट्रीय स्तरातील स्पर्धेत दोन बारामतीकरांनी झेंडा रोवला.
कठिण समजली जाणारी, शारीरिक व मानसिकतेचा कस पाहणारी ही स्पर्धा येथील युसुफ कायमखानी तसेच डॉ. वरद देवकाते यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. समुद्रामधे 1.9 किमी पोहोणे, 90 किमी सायकलिंग तसेच 21 किमी धावणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. युसुफ कायमखानी यांनी ही स्पर्धा 6 तास 48 मिनिटांत पूर्ण केली. तर डॉ. वरद देवकाते यांनी 7 तास 19 मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण केली.
या दोघांना येथील नाना बर्गे यांनी पोहण्याचे मार्गदर्शन केले. गेले वर्षभर हे दोन स्पर्धक कसून सराव करत होते. प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या आरोग्यासाठी रोज कमीतकमी अर्धा तास व्यायामासाठी दिला पाहिजे, असे डॉ. वरद देवकाते यांनी सांगितले. तर बारामतीमध्ये मॅरेथॉन संस्कृती रुजत असून अधिकाधिक लोकांनी यात सहभाग घेतला पाहिजे असे कायमखानी यांनी सांगितले.