डब्लिन – दीपक हुडा, ईशान किशन व कर्णधार हार्दिक पंड्या यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने रविवारी(दि.26) झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात यजमान आयर्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर दोन सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-0 अशी भक्कम आघाडी घेतली. सामना सुरू होण्यापूर्वी पावसाने व्यत्यय आणल्यामुळे हा सामना प्रत्येकी 12 षटकांचाच खेळवला गेला. तीन षटकांत केवळ 11 धावा देत 1 गडी बाद करणारा यजुवेंद्र चहल सामन्याचा मानकरी ठरला.
पंड्याने खेळपट्टी व वातावरण पाहून नाणेफेक जिंकल्यावर आयर्लंडला पहिल्यांदा फलंदाजी दिली. आयर्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांचे 3 फलंदाज बाद झाले तेव्हा त्यांच्या अवघ्या 22 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मात्र, हॅरी टेक्टरने एकाकी लढत देत नाबाद 64 धावांची खेळी केली. त्याला लॉर्केन टकरने 18 धावा करत साथ देत संघाला शतकी धावसंख्या उभारून दिली.
टेक्टरने आपल्या अर्धशतकी खेळीत 33 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 3 षटकार अशी आतषबाजी केली. यावेळी अखेरच्या महत्त्वाच्या षटकांत भारताच्या यजुवेंद्र चहलने भेदक गोलंदाजी करत त्यांच्या धावांवर अंकूश राखला. चहलला साथ देत कर्णधार पंड्या, भुवनेश्वर कुमार व आवेश खान यांनीही प्रत्येकी एक गडी बाद केला. आयर्लंडचा डाव 12 षटकांत 4 बाद 108 धावांवर रोखला गेला.
विजयासाठी 109 धावांचा पाठलाग करताना दीपक हुडाने किशनच्या साथित आक्रमक सुरुवात केली. किशन चांगला खेळत असताना 11 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार यांच्या मदतीने 26 धावा करुन बाद झाला. त्यानंतर हुडाने डाव सावरला. सूर्यकुमार यादवला मात्र, खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी कर्णधार पंड्याने हुडाला सुरेख साथ दिली. त्याने 12 चेंडूत 1 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 24 धावांची खेळी केली. त्यानंतर हुडाने दीनेश कार्तिकला साथिला घेत 9.2 षटकांत 3 गडी बाद 109 धावा करत संघाचा विजय साकार केला. कार्तिक 5 धावांवर नाबाद राहिला. हुडाने 47 धावांची नाबाद खेळी करताना 29 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 2 षटकार फटकावले. आयर्लंडकडून क्रेग यंगने 2 तर जोश लिटीलने 1 गडी बाद केला.
उमरानकडून निराशा
या सामन्यात भारताकडून आयपीएल स्टार व वेगवान गोलंदाज उमरान मलिकने टी-20 क्रिकेट सामन्यात पदार्पण केले. मात्र, त्याला चेंडूचा टप्पा व दीशा अचूक राखता आली नाही व एकमेव षटक टाकताना त्याने तब्बल 14 धावा बहाल केल्या. त्यानंतर मात्र, कर्णधार पंड्याने त्याला गोलंदाजी दिली नाही.
संक्षिप्त धावफलक –
आयर्लंड – 12 षटकांत 4 बाद 108 धावा. (हॅरी टेक्टर नाबाद 64, लॉर्केन टकर 18, अवांतर 10, यजुवेंद्र चहल 1-11, भुवनेश्वर कुमार 1-16, आवेश खान 1-22, हार्दीक पंड्या 1-26). भारत – 9.2 षटकांत 3 बाद 109 धावा. (ईशान किशन 26, हार्दीक पंड्या 24, दीपक हुडा नाबाद 47, दीनेश कार्तिक नाबाद 5, क्रेग यंग 2-18, जोश लिटील 1-39).